नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत देशाचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी दागिने क्षेत्राला चालना देण्यासाठी मोठी घोषणा केली आहे. पॉलिश्ड हिरे आणि रत्नांवरील आयात शुल्क 5 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. तर न अनपॉलिश्ड हिऱ्यांवरील आयात शुल्क शून्य करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
रत्नांवरील आयात शुल्क 7.5 टक्के
सध्या पॉलिश केलेल्या हिऱ्यांवरील तसेच रत्नांवरील आयात शुल्क 7.5 टक्के आहे. लोकसभेत आर्थिक वर्ष 2022-23 चा अर्थसंकल्प सादर करताना, सीतारामन यांनी असेही घोषित केले की, सरकार ई-कॉमर्सद्वारे दागिन्यांची निर्यात सुलभ करेल. यासाठी जूनपर्यंत 'सरलीकृत नियामक फ्रेमवर्क' लागू केले जाईल.
या वस्तूही स्वस्त
अर्थमंत्र्यांनी सर्व गोष्टींवरील कस्टम ड्युटी, आयात शुल्क यासह सर्व शुल्क वाढवणे आणि कमी करण्याबाबत माहिती दिली. त्यानंतर मोबाईल चार्जर, शेतीमाल, हिऱ्यांचे दागिने, पादत्राणे, परदेशातून येणारी मशीन इत्यादी स्वस्त होतील, असे सांगितले. त्याचबरोबर भांडवली वस्तूंवर 7.5 टक्के आयात शुल्क लागू करण्यात आले असून, आयात शुल्कातील सूट काढून टाकण्यात आली आहे.