नवी दिल्ली – आगामी केंद्रीय अर्थसंकल्पात(Budget 2022) रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी मिळू शकते. यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन काही नव्या सेमी हायस्पीड ट्रेनची(Semi High Speed Train) ची घोषणा करण्याची शक्यता आहे. या ट्रेन रुळावरुन १८० ते २०० किमी वेगाने धावू शकतात. भारतात सध्या सेमी हायस्पीड रेल्वे संकल्पना आहे. ज्यात १६०-२०० किमी प्रतितास वेगाने धावणाऱ्या ट्रेन येतात. १ फेब्रुवारीच्या बजेटमध्ये अशाच प्रकारे काही नव्या ट्रेनची घोषणा होऊ शकते.
मागील काही वर्षापासून अर्थसंकल्पातच रेल्वे बजेट मांडला जातो. त्यापूर्वी रेल्वे अर्थसंकल्प वेगळा मांडला जात होता. प्रत्येक वर्षीच्या बजेटमध्ये नव्या ट्रेनची घोषणा होते. मात्र यंदा नव्या ट्रेनच्या यादीत सेमी हायस्पीड ट्रेनचा समावेश केला जाऊ शकतो. सरकार या प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पात वेगळी तरतूद करण्याची शक्यता आहे. एका रिपोर्टनुसार, सरकार स्वर्णिम चतुर्भुज मार्गावर या हायस्पीड ट्रेन चालवण्याची योजना बनवत आहे. मंगळवारी अर्थसंकल्पात या ट्रेनची घोषणा होऊ शकते. याबाबत TOI नं सूत्रांच्या आधारे माहिती दिली आहे.
सूत्रांनी सांगितले की, सरकार या अर्थसंकल्पात काही नव्या रेल्वेची घोषणा करु शकतं. या ट्रेन वंदे भारतसारख्या प्रीमियम असतील. वंदे भारत ट्रेनही सेमी हायस्पीडच्या यादीत येते. या ट्रेनमुळे प्रवाशांच्या वेळेची बचत आणि माफक दरात प्रवास होऊ शकतो. त्यामुळे बजेटमध्ये काही नव्या ट्रेनची घोषणा होऊ शकते. १५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात ७५ वंदे भारत सारख्या ट्रेन चालवण्याची घोषणा केली होती.
मोदी म्हणाले होते की, स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापन दिन पूर्ण होईपर्यंत देशात ७५ प्रीमियम गाड्या चालवल्या जातील आणि या सर्व गाड्या वंदे भारत श्रेणीतील असतील आणि पूर्णपणे देशातच बनवल्या जातील असं त्यांनी सांगितले होते. या श्रेणीच्या काही गाड्याही सुरू झाल्या आहेत. रेल्वेच्या ताफ्यात ६५०० अॅल्युमिनियम कोच, १२४० लोकोमोटिव्ह आणि सुमारे ३५००० वॅगन्सचा समावेश करण्याबाबतही मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. यामुळे देशातील रेल्वे सेवेला गती मिळेल आणि प्रवाशांना सुलभ आणि सहज प्रवास करता येईल.
रेल्वेकडून अॅल्युमिनियमचे डब्याचं उत्पादन
स्टील बॉडी LHB डब्यांमधून हलक्या वजनाचे अॅल्युमिनियमचे डबे बनवणे हे सरकारचे लक्ष आहे. जेणेकरून ट्रेन चालवताना कमी ऊर्जा वापरली जाईल आणि डबे हलके होतील. अॅल्युमिनियमचे डबे बनवून दोन फायदे होतील. एकतर हे वजनाने हलके असल्याने कमी ऊर्जा वापरेल आणि अशा डब्ब्यात अॅल्युमिनियम प्लांटसाठी बॉक्साईटचे लोडिंग जास्त होईल. त्यामुळे ६५ हजार अॅल्युमिनियम डबे बनवण्याचा प्रस्ताव येऊ शकतो. रुळांवर असे डबे बसवून सरकार रेल्वे वाहतूक अधिक गतीमान करु इच्छिते. प्रवासी क्षेत्रात चालवल्या जाणार्या वंदे भारतप्रमाणेच मालवाहतुकीतही ईएमयू सुरू करण्याची योजना आहे.
ईएमयूमध्ये वॅगन्स जोडल्या जातील आणि अशा गाड्यांचा अल्प प्रमाणात पुरवठ्यासाठी फायदा होईल. सध्या रेल्वेचा वाहतूक खर्च १४ टक्के असून तो ११ टक्क्यांवर आणण्याची तयारी सुरू आहे. यामुळे मोल्डिंगचा खर्च कमी होईल आणि लोकांसाठी वाहतूक शुल्कातही कपात होईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्थसंकल्पात सरकार रेल्वेशी संबंधित नवीन तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी वेगळ्या तरतुदीची घोषणा करू शकते.