देशातील ५५ कोटी गरीबांसाठी सुरु करण्यात आलेली आयुष्मान भारत योजनेचा लाभ लवकरच मध्यमवर्गाला देखील मिळण्याची शक्यता आहे. सरकारने याची तयारी सुरु केली आहे. उद्या अर्थसंकल्पात यांची घोषणा होण्याची शक्यता आहे. आयुष्मान योजनेतून १०.७४ कोटी कुटुंबांना आरोग्य सुविधा, मोफत कॅशलेस उपचाराची सेवा देण्यात आली आहे.
केंद्र सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची माहिती दिली आहे. मध्यमवर्गाला देखील आयुष्मान भारतमध्ये सहभागी करून घेण्यात यावे, यावर काही महिन्यांपूर्वीच विचारविमर्श सुरु झाला होता. मध्यमवर्गाला या योजनेत आणण्यासाठी अनेक प्रकारच्या पर्यायांवर विचार केला जात आहे.
कोणाला मिळणार लाभ...यामध्ये वार्षिक उत्पन्न मर्यादा, संगठीत, असंगठीत क्षेत्रातील कर्मचारी असे पर्याय असू शकतात. मध्यमवर्गामध्ये खासगी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना विशेष प्राधान्य दिले जाण्याची शक्यता आहे. यासाठी आपल्या कर्माचाऱ्यांना आयुष्मान भारतमध्ये रजिस्टर करण्यासाठी खासगी कंपन्यांना अधिकार दिले जाऊ शकतात. असे झाल्यास १५००० रुपयांपर्यंत पगार असलेल्यांना ईएसआयसी आणि त्यापेक्षा वरील २५ ते ३० हजार पगार असलेल्यांना आयुष्मान भारत योजनेतून आरोग्य उपचार मिळू शकतात.
प्रिमिअम भरावा लागणारखासगी कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना आरोग्य विमा देतात. काही कंपन्या यासाठी कर्मचाऱ्यांकडून पैसेही घेतात. आयुष्मानसाठी यापेक्षा कमी प्रमिअम या कंपन्यांना द्यावा लागण्याची शक्यता आहे. असे झाल्यास कर्माचाऱ्यांना थेट आयुष्मान योजनेचा लाभ घेण्याचा देखील पर्याय मिळू शकते. नुकतेच गृह मंत्रालयाच्या पुढाकाराने केंद्रीय निमलष्करी दलांना आयुष्मान भारत योजनेशी जोडण्यात आले आहे आणि तेथे कार्यरत असलेल्या सर्व सैनिकांना आयुष्मान कार्ड दिले जात आहे. मध्यमवर्गीयांना आयुष्मान भारतशी जोडण्याच्या दिशेने हे पहिले पाऊल असल्याचे सांगितले जात आहे.
का दिले जाणार...सर्व ५५ कोटी गरीबांना आयुष्मान कार्ड दिले जाणार होते. मात्र या योजनेच्या अंमलबजावणीला साडेतीन वर्षे उलटल्यानंतरही केवळ 17.35 कोटी आयुष्मान कार्ड बनले आहेत. कोरोनामुळे आरोग्याच्या पायाभूत सुविधांवर मोठा भार पडल्यानंतर, सरकार आता लाभार्थी शोधण्यासाठी आणि त्यांना मोठ्या प्रमाणावर आयुष्मान कार्ड देण्याची मोहीम राबवण्याच्या तयारीत आहे.