नवी दिल्ली : ‘भारतात प्रबळ इच्छाशक्ती असलेले सरकार आहे. हे सरकार न घाबरता काम करत आहे. विकास आणि समृद्ध वारसा जपत या सरकारने कोणताही भेदभाव न करता अनेक मोठे निर्णय घेतले आहेत,’ असे सांगत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशाला आगामी २५ वर्षांत स्वावलंबी बनवण्याचा निर्धार व्यक्त केला.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दोन्ही सदनांच्या संयुक्त अधिवेशनात त्यांनी सुमार ६४ मिनिटे संबोधन केले. यावेळी त्यांनी केंद्र सरकारने सर्जिकल स्ट्राइक, दहशतवादावरील कठोरता, कलम ३७० आणि तिहेरी तलाकविषयी घेतलेल्या निर्णयांचा उल्लेख केला.
मुर्मू म्हणाल्या, आपल्याला एक आत्मनिर्भर भारत बनवायचा आहे, जिथे गरिबी नाही आणि मध्यमवर्ग समृद्ध आहे. मुर्मू यांनी ११ कोटी छोट्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी २.२५ लाख कोटी रुपयांच्या सन्मान निधीचाही उल्लेख करून गरिबांना मोफत धान्य देण्याची योजना सुरू ठेवण्याबाबत सूतोवाच केले.
अभिभाषणातील मुद्दे- जगातील दहाव्या अर्थव्यवस्थेपासून आपण पाचव्या क्रमांकावर पोहोचलो आहोत. - कोरोना काळात भारताने २ वर्षांत २२० कोटींहून अधिक लसीचे डोस दिले.- नियंत्रण रेषेपासून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपर्यंत प्रत्येक गैरप्रकाराला चोख प्रत्युत्तर देण्यात आले.-आयुष्यमान भारत आणि जनऔषधी प्रकल्पामुळे गरिबांना एक लाख कोटी रुपयांची मदत झाली.