नवी दिल्ली: अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली असून आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन आर्थिक वर्ष २०२३-२४ साठीचा अर्थसंकल्प सकाळी ११ वाजता सादर करतील. जगभरात मंदीच्या पार्श्वभूमीवर अनेक कंपन्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून नोकरकपातीचा धडाका लावला आहे. भारताच्या उंबरठ्यावर मंदीचे ढग जमू शकतात, असा कयास बांधला जात आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारतीय अर्थव्यवस्थेच्या बाजूने कौल देत दिलासा दिला आहे. अर्थसंकल्पातून आज विविध क्षेत्रांसह सर्वसामान्य नागरिकांसाठी कोणत्या महत्वाच्या घोषणा केल्या जाणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
आजच्या अर्थसंकल्पात कोणत्या घटकाला दिलासा मिळणार आणि कुणावर कराचा बोजा लादला जाणार याकडे लोकांचे लक्ष लागले आहे, सकाळी अकरा वाजता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण अर्थसंकल्प मांडतील. पायाभूत सुविधांना अधिक निधी उपलब्ध करून देण्यावर आणि इमारती आणि रुग्णालयांसाठी खासगी भागीदारी वाढविण्यासाठी तसेच रुग्णालयातील कामकाजाची क्षमता वाढवण्याची शक्यता अर्थ वर्तवली जात आहे. अशा परिस्थितीत लघु आणि मध्यम व्यापाऱ्यांच्या आशा वाढल्या आहेत. तसेच जगातील अनेक मोठ्या कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात केली आहे. त्या पार्श्वभूमीवर आजच्या अर्थसंकल्पात काय-काय असणार आहे.
राष्ट्रपतीच्या अभिभाषणानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी यंदा आर्थिक पाहणी अहवाल संसदेत मांडला. यात चालू आर्थिक वर्षात (२०२३-२४) देशाची अर्थव्यवस्था ६ ते ६.८%नी वाढेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. देशात शेअर बाजाराची वाढ वेगाने होत आहे. ऊर्जा आणि तंत्रज्ञान या क्षेत्रात वाढत्या गुंतवणुकीमुळे बाजार ३.९% इतक्या दराने वाढत आहे. या बाबतीत भारत इतर अनेक देशांना मात देईल असे दिसत आहे.
कोरोनाच्या २ वर्षांनंतर घरांच्या किमतींत वाढ
कोविड-१९ साथीच्या २ वर्षांच्या काळात घरांच्या किमतींत मंदी होती. या किमती आता वाढू लागल्या आहेत. मागणी वाढल्यामुळे पडून असलेल्या घरांची संख्या कमी झाली आहे. गृहकर्जांचा व्याज दर वाढलेला असतानाही घरांची विक्री वाढली आहे.
दरवर्षी एक काेटी ई-वाहनांची हाेणार विक्री
देशात २०३० पर्यंत ई-वाहनांची बाजारपेठ माेठी झेप घेणार असून दरवर्षी १ काेटी ई-वाहनांची विक्री हाेणार असल्याचा अंदाज आहे. यात ५ काेटींहून अधिक प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष राेजगार निर्माण हाेण्याची अपेक्षा आहे. हे क्षेत्र दरवर्षी ४९ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे.
कृषी क्षेत्राची कामगिरी चांगली, नवी दिशा हवी
कृषी क्षेत्राने यंदा चांगली कामगिरी केली. हवामान बदलाचा प्रतिकूल प्रभाव आणि शेतीचा वाढता खर्च या पार्श्वभूमीवरनवी दिशा देण्याची गरज आहे. मागील ६ वर्षांत कृषी क्षेत्राचा सरासरी वृद्धीदर ४.६ टक्के राहिला. २०२१-२२ मध्ये निर्यात उच्चांकी ५०.२ अब्ज डॉलरइतकी राहिली.