Budget 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वातील NDA सरकारचा (Modi 3.0) पहिला अर्थसंकल्प (Budget 2024) येत्या 23 जुलै रोजी सादर होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत हा अर्थसंकल्प सादर करतील. दरम्यान, एनडीए सरकारमध्ये किंगमेकर म्हणून उदयास आलेल्या तेलगू देसम पार्टीला (TDP) या अर्थसंकल्पातून राज्यासाठी मोठ्या अपेक्षा आहेत. याच पार्श्वभूमीवर TDP प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांचे दिल्ली दौरे वाढले आहेत.
चंद्राबाबूंनी घेतली अमित शाह यांची भेट आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आपल्या तीन इच्छा सरकारकडे बोलून दाखवल्या आहेत. विशेष म्हणजे, टीडीपी प्रमुख आपल्या इच्छा पूर्ण करुन घेण्यासाठी सातत्याने दिल्ली दौरे करत असून, भाजपच्या अनेक वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेत आहेत. मंगळवारी(दि.16) त्यांनी अवघ्या 10 दिवसांतच दुसऱ्यांदा दिल्ली गाठून गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. आपल्या तीन इच्छा पूर्ण करुन घेण्यासाठी टीडीपी आग्रही आहे.
चंद्राबाबूंच्या त्या 3 प्रमुख मागण्या कोणत्या?मीडिया रिपोर्ट्सनुसार, चंद्राबाबूंची पहिली इच्छा म्हणजे, अनंतपूर, चित्तूर, कडप्पा, कुरनूल, श्रीकाकुलम, विशाखापट्टणम आणि विजयनगरमसह राज्यातील इतर मागासलेल्या जिल्ह्यांसाठी अर्थसंकल्पीय अनुदान असावे. दुसरी इच्छा म्हणजे, अमरावतीसाठी आर्थिक मदत आणि तिसरी इच्छा, पोलावरम पाटबंधारे प्रकल्पासाठी वेळेत पैसे मिळावेत. दरम्यान, चंद्राबाबू नायडू आपल्या या तीन मागण्या मान्य करुन घेण्याचा प्रयत्न करत आहेत, पण सध्या त्यांनी आंध्र प्रदेशसाठी विशेष दर्जा मिळविण्याची मागणी बाजुला ठेवली आहे.
अर्थमंत्री इतिहास रचणार 23 जुलै 2024 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थमंत्र्यांचे अर्थसंकल्पीय भाषण सकाळी 11 वाजल्यापासून सुरू होईल. देशाच्या अर्थमंत्री म्हणून सीतारामन यांचा हा सलग सातवा अर्थसंकल्प असेल. हा सादर करण्यासोबतच त्या नवा इतिहासही रचतील या अर्थसंकल्पासह सीतारामन, माजी अर्थमंत्री मोरारजी देसाई यांचा विक्रम मोडतील. त्यांनी सलग सहा वेळा अर्थसंकल्प सादर केला होता.