नवी दिल्ली - भारताची अर्थव्यवस्था वेगाने पुढे जातेय ही बाब प्रत्येक भारतीयांसाठी गर्वाची आहे. देशातील जनतेनं त्यांचा निकाल दिला आहे. आता निवडून आलेल्या खासदारांची जबाबदारी आहे की त्यांनी पुढील ५ वर्ष पक्षासाठी नाही तर देशासाठी लढायला हवं. पुढील साडे चार वर्ष देशासाठी समर्पित करा असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना दिला आहे. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत असून उद्या अर्थमंत्री निर्मला सितारामन संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहे.
तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देत म्हटलं की, विरोधकांनी आता जानेवारी २०२९ मध्ये मैदानात यावं. तुम्हाला ६ महिने जे काही खेळ खेळायचे आहेत ते खेळा परंतु तोपर्यंत देशातील गरीब, शेतकरी, युवा आणि महिला यांच्या प्रगतीसाठी काम करा. २०४७ चं स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही ताकदीनं प्रयत्न करत आहोत. मात्र २०१४ ला काही खासदार ५ वर्षासाठी आले, काहींना १० वर्ष काम करण्याची संधी मिळाली परंतु खूप खासदारांना संसदेत त्यांचं म्हणणं मांडण्याची संधी मिळाली नाही. काही नकारात्मक राजकारण करणाऱ्यांनी त्यांचं अपयश झाकण्यासाठी संसदेच्या सभागृहाचा गैरवापर केला. त्यामुळे नव्या खासदारांना संधी मिळावी. त्यांना बोलायला वेळ मिळावा आणि जास्तीत जास्त लोक पुढे येऊ द्या असं आवाहन पंतप्रधानांनी केले.
तसेच ज्यांना सरकार चालवण्याचा जनादेश मिळाला त्यांचा आवाज सभागृहात दाबण्याचा याआधीच प्रयत्न झाला हे सर्वांनी पाहिले. अडीच तास पंतप्रधानांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न झाला. देशातील जनतेने देशासाठी आपल्याला इथं पाठवलं आहे याचा विचार करायला हवा. विरोधकांचा विचार चुकीचा नाही परंतु नकारात्मक विचार वाईट आहे. जनता बारकाईनं आपल्या कामाकडे पाहत आहे. ६० वर्षांनी देशात तिसऱ्यांदा सरकार स्थापन झालं आहे. तिसऱ्या कार्यकाळातील पहिलं बजेट सादर करणं ही गर्वाची गोष्ट आहे असंही पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं.
दरम्यान, मी देशवासियांना जी गॅरंटी दिली आहे ती प्रत्यक्षात अंमलात आणणारं हे बजेट असेल. अमृतकाळातील हा महत्त्वाचा अर्थसंकल्प असणार आहे. आम्हाला ५ वर्ष संधी मिळाली आहे त्याची दिशा ठरवणारा हा बजेट असेल. २०४७ मध्ये विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी पाया रचणारा हा बजेट असणार आहे असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अर्थसंकल्पावर भाष्य केले आहे.