जयपूर - राजस्थान आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये झालेल्या लोकसभा व विधानसभा पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. या दोन्ही राज्यात सर्वच जागांवर भाजपाचा दारुण पराभव झाला आहे. राजस्थानमध्ये ब-याच काळापासून संघर्ष करणा-या काँग्रेसला अखेर जनतेने 'हात' दिला असून पश्चिम बंगालच्या जनतेने तृणमुलवर आपली 'ममता' कायम ठेवली आहे. गुरुवारी संपूर्ण देशाचे लक्ष बजेटवर लागलेले असताना राजस्थान आणि पश्चिम बंगालमधून आलेले निकाल भाजपासाठी धोक्याची घंटा आहे.
राजस्थानमध्ये अजमेर, अलवर या लोकसभेच्या दोन जागांवर तर मांडलगड विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे. अलवरमधून काँग्रेस उमेदवार करण सिंह यादव यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी भाजपाच्या जसवंत सिंह यादव यांचा पराभव केला. अजमेरमधून काँग्रेस उमेदवार रघु शर्मा यांनी भाजपाच्या राम स्वरुप लांबा यांचा पराभव केला.
मांडलगड विधानसभेच्या जागेसाठी दोन्ही पक्षांमध्ये अटीतटीचा सामना झाला. इथून काँग्रेस उमेदवार विवेक धाकड यांनी भाजपाच्या शक्ति सिंह हाडाचा 12,976 मतांनी पराभव केला. राजस्थानात काँग्रेसची कमान सचिन पायलट यांच्या हाती होती. हे निकाल म्हणजे मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या सरकारसाठी एक धोक्याची घंटा आहे. कारण राजस्थानमध्ये वर्षअखेरीस विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या पोटनिवडणुकीकडे सेमीफायनल म्हणून पाहिले जात होते.
पश्चिम बंगालमध्ये तृणमुलचा विजय उलुबेरिया लोकसभा मतदारसंघातून तृणमुल काँग्रेसचे उमेदवार सजदा अहमदने बंपर विजयाची नोंद केली. नुआपाडा विधानसभा पोटनिवडणुकीत तृणमुल उमेदवार सुनील सिंह 1,11,729 मतांनी विजय मिळवला.
म्हणून पोटनिवडणूक राजस्थानातील खासदार सांवरलाल जाट यांच्या निधनामुळे अजमेरची जागा रिक्त झाली होती तर अलवरची जागा महंत चांदनाथ यांच्या निधनानंतर रिक्त झाली होती.