मुंबई- अर्थसंकल्प म्हणजे स्वप्नांची मालिका आणि घोषणांचा पाऊस असल्याची जळजळीत प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे. अर्थसंकल्पातील तरतुदींच्या अंमलबजावणीचा केंद्र सरकारकडे कोणताही रोडमॅप नाही. मोठमोठे आकडे सांगून प्रत्यक्षात लोकांच्या तोंडाला पाने पुसण्याचं काम सरकारनं केलं आहे, असंही अशोक चव्हाण म्हणाले आहेत.हा अर्थसंकल्प सर्वसामान्यांवर कराचा बोजा टाकणारा आहे. तसेच महागाई वाढवण्यासह जनतेची निराशा करणारा हा अर्थसंकल्प ठरला आहे. तर दुसरीकडे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटलांनीही अर्थसंकल्पावर सडकून टीका केली आहे. रब्बी पिकांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमी भाव देण्यात आल्याची केंद्रीय अर्थमंत्र्यांची घोषणा शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक असल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. तसेच हा अर्थसंकल्प म्हणजे केवळ जुमलेबाजी असल्याची टोलेबाजीही त्यांनी केली आहे.ते पुढे म्हणाले की, हा जुमलेबाज अर्थसंकल्प आहे. पुढील निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारने देशाला जुमले विकण्याचे प्रयत्न केले आहेत. असेच अनेक जुमले त्यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत सांगितले होते. त्याचे पुढे काय झाले, ते संपूर्ण देशाला माहिती आहे. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पातील नव्या जुमलेबाजीवर जनता विश्वास ठेवण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. जीडीपी आणि विकास दर वाढल्याचे सरकार सांगते. परंतु, देशात ना व्यापार वाढला, ना रोजगार निर्मिती वाढली, ना जीवनमान सुधारले. विकास दर वाढला असेल तर त्याचे सकारात्मक परिणाम प्रत्यक्ष जमिनीवर का दिसून येत नाहीत, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.सत्ताधुंदांचा दिशाभूल करणारा अर्थसंकल्प - धनंजय मुंडेकेंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा वस्तुस्थितीचं भान गमावलेल्या, आत्ममग्न सत्ताधुंदांचा दिशाहीन व जनतेचा दिशाभूल करणारा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पाने शेतकरी, नोकरदार वर्गासह सामान्य जनतेची घोर निराशा केली आहे. ही सामान्य जनताच सरकारला धडा शिकवील, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.
4 कोटी कुटुंबाना मोफत वीज कनेक्शन देण्याची अर्थमंत्र्यांची घोषणा स्वागतार्ह- चंद्रशेखर बावनकुळेसौभाग्य योजनेतून वीज कनेक्शन नसलेल्या देशातील 4 कोटी कुटुंबाना मोफत वीज कनेक्शन देण्याची अर्थमंत्र्यांची घोषणा स्वागतार्ह आहे. 18 कोटी महिलांना उज्ज्वला गॅस कनेक्शनचा निर्णय ग्रामीण व गरीब महिलांना दिलासा देणारा. महिला बचत गटांना 42 हजार कोटींवरून 55 हजार कोटी कर्ज देण्याचा निर्णय गरीब महिलांना सक्षम व स्वतःच्या पायावर उभे करणारा आहे. शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करणारा अर्थसंकल्प- पांडुरंग फुंडकरकृषि क्षेत्रातील कर्ज पुरवठा, पायाभूत सुविधा मजबूत करतानाच शेतक-यांच्या उत्पादनाला दीड पट हमीभाव देऊन बाजार व्यवस्था अधिक सक्षम करण्याचा व शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे, अशी प्रतिक्रिया कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिली आहे. याशिवाय सूक्ष्मसिंचन, अन्न प्रक्रिया उद्योग, सेंद्रिय शेती आणि बांबू शेती याकरीता भरीव तरतूद केली आहे. देशात ४२ मेगा फूड पार्क विकसित करून शेतकरी कंपन्यांना उत्तेजन देण्यासाठी ऑपरेशन ग्रीन या योजनेसाठी भरीव निधी दिला आहे.