नवी दिल्ली: 31 जानेवारीला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणापासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. काल म्हणजेच 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत देशाचा अर्थसंकल्प मांडला. दरम्यान, आता आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या आभार प्रस्तावावरील चर्चेने संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होणार आहे.
दोन्ही सभागृहात चर्चेसाठी 12-12 तासांचा अवधी देण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 7 फेब्रुवारीला लोकसभेत आणि 8 फेब्रुवारीला राज्यसभेत चर्चेला उत्तर देतील. भारतीय जनता पक्षाचे हरीश द्विवेदी बुधवारी म्हणजेच आज लोकसभेत आभारप्रस्ताव मांडतील, तर पक्षाच्या गीता उर्फ चंद्रप्रभा या राज्यसभेत आभार प्रस्ताव मांडतील. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसर्या दिवशी म्हणजेच आज लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर काँग्रेस नेते राहुल गांधी आपली प्रतिक्रिया देतील.
एकूण 12 तासांच्या चर्चेच्या वेळेपैकी एक तास काँग्रेसला देण्यात आला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी संसदेत अर्थसंकल्प सादर केल्यानंतर लगेचच राहुल गांधी यांनी ट्विटरवर केंद्राला अर्थसंकल्पावर 'झिरो-सम बजेट' म्हणत टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत म्हटले होते की, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आधी अर्थसंकल्प समजून घेतला पाहिजे. आम्ही टीकेला सामोरे जाण्यास तयार आहोत, परंतु जबाबदार व्यक्तीने अशी विधाने करू नये, असे त्या म्हणाल्या होत्या.