"नऊ लाख पदे रिक्त, किती जणांना दिल्या नोकऱ्या?", बेरोजगारीवरून काँग्रेसने मोदी सरकारला घेरले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2022 03:40 PM2022-02-02T15:40:44+5:302022-02-02T16:09:28+5:30
Budget Session 2022 : 2014 च्या निवडणुकीत तुम्ही दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते, त्याचे काय झाले? असा सवाल करत आता येत्या पाच वर्षांत 60 लाख नवीन नोकऱ्यांचे आश्वासन देत आहोत, असे मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले.
नवी दिल्ली : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी बेरोजगारीच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला कोंडीत पकडले. काँग्रेसचे राज्यसभा खासदार मल्लिकार्जुन खर्गे यांनी अर्थसंकल्पात पुढील पाच वर्षांत 60 लाख नव्या नोकऱ्या देण्याच्या घोषणेवरून केंद्र सरकारला धारेवर धरले.
2014 च्या निवडणुकीत तुम्ही दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते, त्याचे काय झाले? असा सवाल करत आता येत्या पाच वर्षांत 60 लाख नवीन नोकऱ्यांचे आश्वासन देत आहोत, असे मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले. भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारवर मल्लिकार्जुन खर्गे यांनी टीका केली.
देशात मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी आहे. मोठे कारखाने बंद पडत आहेत, नवीन गुंतवणूक येत नाही आणि सरकारी नोकऱ्या कमी होत असल्याने तरुण अडचणीत आले आहेत, असे ते म्हणाले. याचबरोबर, मल्लिकार्जुन खर्गे यांनी केंद्र सरकारला विचारले की, 2014 मध्ये तुम्ही दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते. त्याआधारे तुम्ही आतापर्यंत 15कोटी नोकऱ्या द्यायला हव्या होत्या. पण प्रत्यक्षात तुम्ही किती नोकऱ्या दिल्या? असा सवाल मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला.
Nine lakh posts are vacant in the Central Govt. About 15% of posts are vacant in the Railways, 40% in Defence, & 12% in the Home Affairs. Today unemployment rate in urban areas stands 9% & in rural areas, 7.2%: Leader of Opposition in Rajya Sabha, Mallikarjun Kharge pic.twitter.com/kpksWIDs1J
— ANI (@ANI) February 2, 2022
'9 लाख पदे रिक्त असून 60 लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासन'
यंदाच्या अर्थसंकल्पात तुम्ही पुढील पाच वर्षांत केवळ 60 लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले आहे, असे विधान मल्लिकार्जुन खर्गे यांनी केले. तर केंद्र सरकारमध्ये नऊ लाख पदे रिक्त आहेत. अधिकृत आकडेवारी देताना मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हणाले की, रेल्वेमध्ये 15 टक्के, संरक्षण क्षेत्रातील 40 टक्के आणि गृहखात्याशी संबंधित 12 टक्के पदे रिक्त आहेत, मग ती का भरली जात नाहीत? आज शहरी भागात बेरोजगारीचा दर नऊ टक्क्यांवर तर ग्रामीण भागात 7.2 टक्क्यांवर गेला आहे, असे मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितले.