नवी दिल्ली - अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले. संसदेच्या या अधिवेशनात अनेक ऐतिहासिक विधेयकांवर चर्चा होणार असून व्यापक चर्चेतून राष्ट्राची ताकद वाढवणारे कायदे बनतील. त्याशिवाय यंदाच्या अधिवेशनात महिलांसाठी असे निर्णय घेण्यात येतील ज्यातून त्यांचा सन्मानपूर्वक जीवन मिळेल असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं.
पंतप्रधान मोदींनी त्यांच्या निवेदनापूर्वी लक्ष्मी मातेचं स्मरण केले. ते म्हणाले की, खूप जुनी परंपरा आहे. माता लक्ष्मी कल्याणासह समृद्धी विवेकही प्रदान करते. देशातील प्रत्येक गरीब आणि मध्यमवर्गीयांवर माता लक्ष्मीची विशेष कृपा बनून राहू दे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून कामगिरी करत आहे. माझ्या तिसऱ्या कार्यकाळातील हा पहिला संपूर्ण बजेट असेल. २०४७ साली जेव्हा स्वातंत्र्याला १०० वर्ष पूर्ण होतील तोपर्यंत विकसित भारताचं जो संकल्प देशाने घेतला आहे, त्याला बजेट अधिवेशनातून नवा विश्वास आणि ऊर्जा मिळेल असं त्यांनी म्हटलं.
त्याशिवाय २०१४ पासून आतापर्यंत कदाचित हे पहिलेच बजेट असेल ज्याच्या १-२ दिवसाआधी कोणतीही 'विदेशी ठिणगी' पेटली नाही. परदेशातून काही आले नाही. प्रत्येक अधिवेशनापूर्वी काही लोक तयार बसलेले असतात त्यांना इथं हवा देणाऱ्यांची कमी नाही असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. २०१४ पासून देशात मोदी सरकार आल्यापासून एक ट्रेंड सुरू असतो. अधिवेशनाच्या पूर्वी परदेशातून एखादा रिपोर्ट येतो, त्यावरून विरोधक सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न करतात, हिंडेनबर्ग रिपोर्ट, गुजरात दंगलीवर डॉक्युमेंटरी, पेगासस रिपोर्ट यासारखे अनेक मुद्दे अधिवेशनाच्या काही दिवस आधी चर्चेत येतात त्यावरून मोदींनी हे भाष्य केले आहे.
दरम्यान, भाजपा नेत्यांनीही विरोधकांच्या रणनीतीवरून संशय व्यक्त केला आहे. मागील ३ वर्षात जेव्हा कधीही संसदेचे अधिवेशन सुरू होते त्याआधी एखादा रिपोर्ट प्रसिद्ध होतो हा फक्त योगायोग असतो की अन्य काही..? १९ जुलै २०२१ ला अधिवेशन सुरू झाले त्याआधी १८ तारखेला पेगासस रिपोर्ट जारी झाला. २४ जानेवारी २०२३ रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले त्याच्याआधी १७ जानेवारीला बीबीसीचं इंडिया द मोदी क्वेश्चन रिपोर्ट प्रसिद्ध झाला होता. १० मे २०२४ रोजी कोरोना वॅक्सीनवर रिपोर्ट आला तेव्हा लोकसभा निवडणूक तोंडावर होती असा आरोप भाजपा खासदार सुधांशु त्रिवेदी यांनी केला आहे.