ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. ७ - नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून सुरूवात झाली खरी, मात्र महागाईच्या मुद्यावरून विरोधकांनी गोंधळ माजवल्याने लोकसभेचे कामकाज दुपारी १२ पर्यंत तहकूब करण्यात आले.
आजच्या दिवसाचे कामकाज सुरू होताच प्रश्नोत्तराच्या तासात विरोधीपक्षाच्या खासदारांनी सभागृहाच्या मोकळ्या जागेत धाव घेत महागाईच्या मुद्द्यावरून सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यास सुरूवात केली. गदारोळ वाढत चालल्याने लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी लोकसभेचे कामकाज दुपारी बारापर्यंत तहकूब केले.
दरम्यान नव्या सरकारचा पहिला रेल्वे अर्थसंकल्प उद्या म्हणजेच मंगळवार ८ जुलै रोजी आणि केंद्रीय अर्थसंकल्प गुरूवार, १० जुलै रोजी मांडण्यात येणार असून सर्व देशाचे लक्ष याकडे लागले आहे.