हरीश गुप्ता
नवी दिल्ली : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २९ जानेवारीपासून सुरू होत असून त्या पार्श्वभूमीवर राज्यसभेचे अध्यक्ष एम. व्यंकय्या नायडू यांनी वरिष्ठ सभागृहाच्या अनेक सदस्यांसह कोविड चाचणी करून घेतली. अँटिजेन चाचण्यांत कोणीही सकारात्मक आढळले नाही.
याशिवाय राज्यसभा सचिवालयाचा कर्मचारी व अधिकारी वर्ग अशा १२०० जणांनी कोविड चाचणी करून घेतली. गेल्यावर्षी पावसाळी अधिवेशन हे कोविडच्या निर्बंधांमध्ये घेतले गेले. अर्थसंकल्पीय अधिवेशन हेही अशाच निर्बंधांत होत आहे. कोविड महामारीचा जोर नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये कमी होत होता. त्यामुळे हिवाळी अधिवेशन झाले नाही. राज्यसभा सचिवालयाचे अधिकारी आणि कर्मचारी असे ७१५ जण सभागृहाच्या कामकाजाशी थेट जोडलेले नाहीत. या कर्मचाऱ्यांनी अँटिजेन चाचणी करून घेतली, तर सभागृहाच्या कामकाजाशी संबंधित असलेल्या ४९४ जणांनी आरटीपीसीआर चाचणी करून घेतली.गेल्यावर्षी पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर राज्यसभा सचिवालयाचे ६४ कर्मचारी व अधिकारी चाचण्यात सकारात्मक आढळले होते. एम. व्यंकय्या नायडू यांनी बुधवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तयारीचा सविस्तर आढावा सेक्रेटरी जनरल आणि सचिवालयातील इतर अधिकाऱ्यांसोबत घेतला.
संसद सदस्यांचीही होणार चाचणीसंसद सदस्यांना अशाच चाचण्यांतून जावे लागेल आणि येथे तीन दिवस त्या होतील. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या ३३ बैठका शुक्रवारपासून सुरू होतील. २०२१-२०२२ वर्षासाठीचा अर्थसंकल्प कोविड महामारीचा उद्रेक झाल्यानंतर पहिल्यांदाच सादर होत आहे.