नवी दिल्ली: भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सोमवारी राज्यसभेतील पहिल्यावहिल्या भाषणात काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी त्यांनी रोजगाराच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला. बेरोजगार राहण्यापेक्षा भजी विकणे केव्हाही चांगले आहे. एखादा गरीब माणूस आज भजी विकत असेल तर त्याच्या भावी पिढ्या उद्योजक होऊ शकतात. एखाद्या चहावाल्याचा मुलगा पंतप्रधान होऊ शकतो, तर या देशात काहीही शक्य आहे. मात्र, काँग्रेस नेत्यांकडून भजी विक्रेत्याची तुलना भिकाऱ्याशी होते, यावरून त्यांच्या मानसिकतेचा अंदाज येऊ शकतो, असे अमित शहा यांनी म्हटले. सध्या देशात बेरोजगारी आहे, हे आम्ही नाकारत नाही. मात्र, हा काँग्रेसच्या गेल्या 55 वर्षांच्या राजवटीचा परिणाम आहे. इतकेच होते तर काँग्रेसने त्यांच्या काळात या समस्येवर उपाय शोधून का काढला नाही, असा सवालही अमित शहा यांनी उपस्थित केला.
आपल्या पहिल्याच भाषणात त्यांनी काँग्रेसवर हल्ला चढवत नरेंद्र मोदी सरकारच्या कामाची मुक्तकंठाने तारीफ केली. राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर ते बोलत होते. 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीत देशातील जनतेने भाजपाला बहुमताने विजयी केले. गेल्या 30 वर्षात प्रथमच असे घडले. यावरून काँग्रेसच्या राजवटीविरोधात असलेल्या जनमताची कल्पना येऊ शकेल. काँग्रेसची राजवट धोरण लकव्यासाठी ओळखली जात होती. या काळात शेतकऱ्यांना प्रत्येक गोष्टीसाठी भरपूर संघर्ष करावा लागला. आजपर्यंत शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देणे हा केवळ चुनावी जुमला होता. मात्र, आमच्या सरकारने या निर्णयाची प्रत्यक्षात अंमलबजावणी केली, असा दावा अमित शहा यांनी केला.