नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आज संसदेत अर्थसंकल्प मांडणार आहेत. सलग पाचव्यांदा ते अर्थसंकल्प मांडत आहेत. केवळ देशच नाही तर संपूर्ण जगाचं लक्ष अरुण जेटली यांच्यावर आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा अर्थसंकल्प सर्वसामान्यांचं स्वप्न पूर्ण करणारा असेल असं म्हटलं आहे. याआधी अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला यांनीदेखील हा अर्थसंकल्पन सर्वसामान्यांसाठी असेल असं म्हटलं होतं.
दरम्यान केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली संसदेत पोहोचले असून कॅबिनेट बैठकीला सुरुवात झाली आहे. बैठकीत अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली. संसदेत पोहोचण्याआधी अरुण जेटली राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भेटीला पोहोचले होते. अरुण जेटल अर्थसंकल्पात कोणकोणत्या घोषणा ते करणार आहेत, यावर सर्वांची नजर आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पाबद्दल उत्सुकता आहे. आज सकाळी 11 वाजता प्रतीक्षित असा केंद्रीय अर्थसंकल्प अरूण जेटली सादर करणार असून जेटली हे हिंदीमधून सादर करणार आहेत. हिंदीमधून बजेट सादर करणारे अरूण जेटली हे भारताचे पहिले अर्थमंत्री ठरणार आहेत. आत्तापर्यंत सादर झालेले सगळे केंद्रीय अर्थसंकल्प इंग्रजीतून मांडण्यात आले होते. देशभरातील बहुसंख्य राज्यांमधील ग्रामीण भागातील जनतेशी थेट संवाद व्हावा यासाठी जेटली हिंदीतून बोलणार असल्याची चर्चा आहे.
आगामी काही दिवसांमध्ये आठ राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. तसेच वर्षभरानं लोकसभेच्या निवडणुका आहेत, त्यामुळे संपूर्ण असं हे शेवटचं बजेट असेल. त्यामुळेच हे बजेट ग्रामीण भारतासाठी असेल असं बोललं जातंय. त्यामुळेच ग्रामीण भारताला ते नीट समजावं, त्यांच्या अर्थमंत्र्यांचा थेट संवाद व्हावा यासाठी अर्थसंकल्प हिंदीतून मांडण्यात येईल आणि आत्तापर्यंतचा इंग्रजीतून बजेट मांडण्याचा पायंडा जेटली मोडतील असं मानलं जात आहे.