संजय शर्मा, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : सर्वांत मोठा लोकशाही उत्सव असलेल्या भारतातील लोकसभा निवडणुकीचा बिगुल शनिवारी वाजणार आहे. १६ मार्च रोजी दुपारी तीन वाजता भारतीय निवडणूक आयोग निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करणार आहे. त्याबाबत निवडणूक आयोगाच्या प्रवक्त्याने ‘एक्स’वर ही माहिती दिली. त्यानंतर देशात आदर्श आचारसंहिता लागू होईल.
लोकसभेच्या ५४३ जागांसाठी सात टप्प्यांत मतदान होऊ शकते. याआधीही २०१४ आणि २०१९ मध्ये सात टप्प्यांत मतदान झाले होते. तत्पूर्वी, निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर ज्ञानेश कुमार व सुखबीर सिंग संधू यांनी शुक्रवारी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासोबत तयारीचा आढावा घेतला.
सलग तिसऱ्यांदा निवडणूक जिंकून हॅट्ट्रिक करण्यासाठी भाजप रिंगणात उतरली आहे, तर विरोधी पक्ष एकजूट होऊन इंडिया आघाडीच्या माध्यमातून भाजपचा विजयी रथ रोखण्याचा प्रयत्न करणार आहेत.
अब की बार, ३७० पार
२०१९ मध्ये भाजपने ३०३ जागा जिंकून इतिहास रचला होता. ‘अब की बार, ३७० पार’चा नारा भाजपने यंदा दिला आहे. तर एनडीएसह ४०० जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यासाठी भाजपने नियोजन आणि तयारीला सुरुवातही केली आहे. अयोध्येत राम मंदिराची उभारणी, कलम ३७० रद्द करणे, तिहेरी तलाक कायदा रद्द करणे, सीएए लागू करणे, ८० कोटी लोकांना मोफत अन्नधान्य तसेच गरीब कल्याणकारी योजना या भाजपच्या जमेच्या बाजू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपला विश्वास आहे की, केंद्रात तिसऱ्यांदा पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन होईल.
विरोधकांची एकजूट
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विजयी रथ रोखण्यासाठी विरोधी पक्षांची आघाडी इंडिया एकजूट होऊन लढणार आहे. जास्तीत जास्त जागांवर विरोधकांचा एकच उमेदवार उभा करून विरोधी मतांचे विभाजन रोखण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. पश्चिम बंगाल, पंजाब अशी काही राज्ये सोडली तर इतर राज्यांत विरोधी पक्ष एकवटले आहेत. पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून एकाही नेत्याच्या नावावर एकमत न होणे ही विरोधकांची सर्वांत मोठी कमजोरी आहे. ममता बॅनर्जी, भगवंत मान, मायावती यांसारख्या नेत्यांनी आघाडी नाकारणे ही एक इंडिया आघाडीसाठी नकारात्मक बाजू आहे.