नवी दिल्ली : लोकसभेची रंगीत तालीम असलेल्या मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरमच्या विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. या निवडणुकांच्या तारखा मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सोमवारी जाहीर केल्या.
राजस्थान आणि छत्तीसगड या दोन मोठ्या राज्यांमध्ये सत्तेत असलेल्या काँग्रेससाठी ही निवडणूक अग्निपरीक्षा असेल. भाजपसाठी या निवडणुकीत बरेच काही पणाला लागले आहे, कारण लोकसभा निवडणुकीवर त्याचा परिणाम निश्चित होणार आहे.
मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये भाजप व काँग्रेसमध्ये थेट लढत होणार असून, तेलंगणामध्ये बीआरएस, काँग्रेस आणि भाजपमध्ये तर मिझोराममध्ये मिझो नॅशनल फ्रंट विरुद्ध काँग्रेस अशी टक्कर असेल.
प्रलोभनमुक्त निवडणुका होण्यासाठी प्रथमच नवीन निवडणूक जप्ती व्यवस्थापन प्रणाली निवडणूक आयोगाने आणली आहे. मनी पॉवरचा वापर अजिबात सहन केला जाणार नसल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
कोण जिंकणार? मध्य प्रदेशमध्ये भाजपला दणका तर राजस्थानमध्ये पुन्हा कमळ? सी-व्होटर व एबीपीचे निवडणूक पूर्व सर्वेक्षणपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सर्व राज्यांमध्ये प्रचंड बहुमताने सरकार स्थापन करेल, असे भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी म्हटले आहे. तर निवडणुका जाहीर झाल्यामुळे भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या निरोपाची घोषणा झाली आहे. काँग्रेस पक्ष ताकदीने लोकांमध्ये जाईल, असे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटले आहे.