नवी दिल्ली, दि. 7 - पर्यावरणप्रेमी असलेल्या पर्यायी ऊर्जेवर चालणाऱ्या गाड्या बनवा अन्यथा, कारखान्यावर बुलडोझर चालवला जाईल त्यास तयार रहा असा कडक इशारा रस्ते व महामार्गाचे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी कार उत्पादकांना दिला आहे. वीजेवर चालणाऱ्या गाड्यांसदर्भात मंत्रिमंडळाचा अहवाल तयार असून त्यामध्ये वाहनं चार्ज करणाऱ्या स्टेशन्सचा विचार करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
तुम्हाला आवडो अथवा न आवडो पर्यायी ऊर्जेवर चालणाऱ्या वाहनांकडे वळावेच लागेल असेही त्यांनी सांगितले. आणि मी तुम्हाला विचारत नाहीये तर सांगतोय की प्रदूषण करणाऱ्या पारंपरिक उर्जास्त्रोतांवर चालणाऱ्या गाड्याच बनवाल तर मी बुलडोझर फिरवीन असे गडकरी म्हणाले. आयात कमी करणं आणि प्रदूषण नियंत्रणात ठेवणं हे सरकारचे स्पष्ट धोरण असल्याचे गडकरी यांनी सिअॅम या कार उत्पादक संघटनेच्या वार्षिक कार्यक्रमात ते बोलत होते.
जे सरकारला मदत करतील त्यांना निश्चित फायदा होईल आणि जे कुणी निव्वळ पैसा कमवायचा विचार करतील त्यांना त्रास होईल असा इशाराही त्यांनी दिला. पर्यायी ऊर्जेवर चालू न शकणारी प्रचंड वाहने ताफ्यात पडून आहेत अशी तक्रार मागाहून करू नका असे गडकरी म्हणाले. इलेक्ट्रिक वेहिकल्सवर लवकरच सरकार धोरण आखणार असून सध्या या विषयावरील चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचे त्यांनी सूचित केले.
भविष्य पेट्रोल व डिझेलच्या गाड्यांचे नसून पर्यायी ऊर्जेचे असल्याचे त्यांनी सांगितले. मी आधी तुम्हाला नम्रपणे संशोधन करण्यास सांगितले. प्रथम ज्यावेळी मी बोललो, त्यावेळी तुम्ही म्हणालात बॅटरी खूप महाग पडते. आता बॅटरीची किंमत 40 टक्क्यांनी घसरली आहे. आणि तुम्ही आता उत्पादनाच्या दृष्टीने सुरूवाती कराल तर या किमती आणखी कमी होतील, असे ते म्हणाले. कार, बसेस, टॅक्सी अथवा मोटरसायकल काही असो भविष्य हे वीजेवर चालणाऱ्या गाड्यांमध्ये असल्याचे गडकरी यांनी सांगितले.
पेट्रोल - डिझेलच्या गाड्यांमुळे प्रदूषण वाढते हे सांगतानाच भारताची आयात दरवर्षी सात लाख कोटी रुपयांची असल्याचे सांगत हे दुहेरी नुकसान असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.