नवी दिल्ली, दि. 8 - अयोध्येतील वादग्रस्त बाबरी मशिदची जागा आमच्या मालकीची असून तिथं राम मंदिर बांधू द्यायला आमची हरकत नसल्याचे प्रतिज्ञापत्र उत्तर प्रदेशातील शिया वक्फ बोर्डाने सर्वोच्च न्यायालयात दिले आहे. राम जन्मभूमीपासून काही अंतरावर जिथे मुस्लिमांची वस्ती आहे, तिथं मशिद बांधावी अशी भूमिकाही बोर्डाने घेतली आहे.बाबरी मशिद ही आमच्या मालकीची जागा आहे, असं या वक्फ बोर्डाने नमूद केलं आहे. या वादामध्ये सर्वमान्य तोडगा काढण्याचा केवळ आम्हाला अधिकार असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. अयोध्या प्रकरणावर योग्य तोडगा काढण्यासाठी काही वेळ द्यावा अशी मागणीही शिया वक्फ बोर्डाने सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे.शिया वक्फ बोर्डाकडून झालेला हा हस्तक्षेप ईश्वरी कृपेने झाला असल्याची भावना राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी व्यक्त केली आहे. अलाहाबाद हायकोर्टाने 2010 मध्ये निकाल देताना सदर जागा राम लल्ला, निर्मोही आखाडा आणि सुन्नी वक्फ बोर्डाला समसमान वाटून दिली होती. तेव्हापासून हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पडून आहे. बाबरी मशिद - राम जन्मभूमी संदर्भातील 2.7 एकर जागेसंदर्भातील याचिकांची सुनावणी लवकर घेण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात मान्य केली होती. त्यासंदर्भात 11 ऑगस्ट ही तारीख जाहीर करण्यात आली.अलाहाबाद हायकोर्टाच्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयाचे त्रिसदस्यीय खंडपीठ सुनावणी घेणार आहे. अनेक दशकं प्रलंबित असलेलं हे प्रकरण लवकरात लवकर निकाली काढावं अशी मागणी सुब्रमण्यम स्वामी यांनी सरन्यायाधीश जे. एस. केहार यांच्याकडे केली होती.
बाबरी मशिदीची जागा आमच्या मालकीची, तिथं राममंदिर बांधावं - शिया वक्फ बोर्डाचं सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2017 4:02 PM
अयोध्येतील वादग्रस्त बाबरी मशिदची जागा आमच्या मालकिची असून तिथं राम मंदीर बांधू द्यायला आमची हरकत नसल्याचे प्रतिज्ञापत्र उत्तर प्रदेशातील शिया वक्फ बोर्डाने सर्वोच्च न्यायालयात दिले आहे.
ठळक मुद्देबाबरी मशिद ही आमच्या मालकिची जागा आहे असं या वक्फ बोर्डाने नमूद केलं आहे.राम जन्मभूमीपासून काही अंतरावर जिथे मुस्लीमांची वस्ती आहे, तिथं मशिद बांधावी अशी भूमिकाही बोर्डाने घेतली आहेशिया वक्फ बोर्डाकडून झालेला हा हस्तक्षेप ईश्वरी कृपेने झाला असल्याची भावना राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी व्यक्त केली