ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद(बिहार), दि. 24 - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छ भारत अभिनायानाचा प्रसार करताना बिहारच्या औरंगाबादचे जिल्हा दंडाधिका-यांची जीभ घसरली. एका रॅलीला संबोधित करताना त्यांनी स्टेजवरून एका गरिबाला ‘बायकोला विक आणि शौचालय बांध’ असं उर्मट आणि संतापजनक उत्तर दिलं.
वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, घरात शौचालय बांधण्यासाठी जिल्हा दंडाधिकारी कंवल तनुज यांनी एका गरीब व्यक्तीला बायकोला विक आणि शौचालय बांध असं विचित्र उत्तर दिलं. त्यांच्या या उत्तरानंतर वादाला तोंड फुटलं आहे. भाषणा दरम्यान ते म्हणाले, जे लोक घरात शौचालय बांधू शकत नाहीत त्यांनी आपल्या बायकोला विकावं.
विशेष म्हणजे शौचालयाचं महत्त्व सांगण्यासाठीच कंवल तनुज गावात आले होते. शौचालयांची कमतरता असल्यामुळे महिला शौचासाठी उघड्यावर जातात. त्यामुळे त्यांच्यावर बलात्कार किंवा अतिप्रसंग होतात. एक शौचालय बांधण्यासाठी केवळ 12 हजार रुपये लागतात. स्त्रियांच्या चारित्र्यापेक्षा ही रक्कम मोठी आहे का?, असं दंडाधिकारी म्हणाले. 12 हजार रूपयांमुळे आपल्या पत्नीवर बलात्कार व्हावा असं कोणत्या पतीला वाटेल. माझ्या पत्नीवर बलात्कार करा आणि मला 12 हजार रुपये द्या असं कोणी गरीब माणूस म्हणतो का, हीच मानसिकता असेल तर बायकोचा लिलाव करा किंवा तिला विकून टाका’ असं ते म्हणाले.
या विधानामुळे समाजवादी पक्षाने कंवल तनुज यांच्यावर कारवाई करण्याची मागणी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडे केली आहे.