कोलकाता, दि. 5 - कोलकात्यातील बुरा बाजार भागात एक इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे, तर तिघे जण गंभीर जखमी आहेत. कोलकात्यातील इमारत कोसळल्याचं वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. या दुर्घटनेत तीन जण गंभीररीत्या जखमी आहेत. ज्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. तसेच जखमींची स्थिती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. हल्ल्यात एका युवकाचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी कोलकाता महापालिकेचे कर्मचारी बचावकार्य राबवत आहेत. मात्र इमारत कोसळल्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
गेल्या महिन्यातही मुंबईतल्या भेंडी बाजारातही एक जुनी इमारत कोसळून 33 जणांचा मृत्यू झाला होता. मुसळधार पावसाच्या तडाख्यानंतर गुरुवारी (31 ऑगस्ट) मुंबईतील भेंडी बाजारातील पाकमोडिया स्ट्रीटवरील 117 वर्षे जुनी सहा मजली हुसैनी इमारत सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास पत्त्यासारखी कोसळली होती. या दुर्घटनेत 33 जणांना जीव गमवावा लागला होता. तर 46 जणांना ढिगा-यातून सुखरुपरीत्या बाहेर काढण्यात आले आहे. मृतांमध्ये 24 पुरुष आणि 9 महिलांचा समावेश आहे. दरम्यान, शुक्रवारी सकाळी एनडीआरएफकडून बचावकार्य थांबवण्यात आले आहे. रात्रभर हे बचावकार्य सुरू होते. सकाळी 6.30 वाजण्याच्या दरम्यान शेवटचा मृतदेह बाहेर काढण्यात आल्याची माहिती एनडीआरएफनं दिली. दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.इमारतीत तळ मजल्यावर लहान मुलांची नर्सरी शाळा, पहिल्या मजल्यावर चार खोल्या तर इतर माळ्यांवर प्रत्येकी एक प्रमाणे एकूण दहा खोल्या होत्या. प्राथमिक माहितीनुसार, इमारतीत नऊ कुटुंब राहत असून, 60 ते 70 लोक होते. इमारत दुर्घटनेनंतर सुरक्षेच्या कारणास्तव शेजारच्या दोन इमारतींमधील कुटुंबांनाही सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. अग्निशमन दलाचे जवान, राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद पथकाचे जवान आणि अन्य यंत्रणेने जिकिरीचे प्रयत्न करीत जखमींना सुखरूप बाहेर काढले. म्हाडाने 2011मध्येच ही इमारत धोकादायक घोषित केली होती. त्यानंतर ‘सैफी बु-हाणी अपलिफमेंट ट्रस्ट रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट’मध्ये होती. 2016मध्ये इमारत पाडण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र रहिवाशांनी घराबाहेर पडण्यास नकार दिला होता.