वाराणसी - बम बम भोले, हरहर महादेव या घोषणांनी घुमाणाऱ्या भगवान शिवशंकर यांची पवित्र भूमी असलेल्या वाराणसीत भवन कोसळून मोठा अपघात झाला आहे. आज सकाळीच काशी विश्वनाथ धामजवळील मोडकळीस आलेले भवन कोसळले. या दुर्दैवी घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. मदत आणि बचावकार्य सुरू असून मृतांची संख्या वाढण्याची शंका व्यक्त होत आहे.
काशी विश्वनाथ मंदिर परिसरात अचानक भवन कोसळल्याने एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच, वाराणसी जिल्हा प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. एनडीआरएफ आणि एसडीआरएफ टीमलाही पाचारण करण्यात आले. या दोन्ही पथकांकडून बचावकार्य सुरू असून सिमेंटच्या मलब्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यात येत आहे.
विश्वनाथ कॉरिडोरसाठी होणाऱ्या खोदकामामुळे या मोडकळीस आलेल्या भवनाचा पाया खचला होता. या जर्जर भवनसाठी काम करणारे कामगार हे मूळ पश्चिम बंगालचे रहिवाशी होते. हे भवन खूप जुने असल्याचे सांगण्यात येत असून मोडकळीस आले होते. मलब्याखालून दोन मजूरांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर, 6 मजूरांना जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात आलं असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. अद्यापही मदत व बचावकार्य सुरूच आहे.