नवी दिल्ली - आपल्या स्वप्नातलं घर बांधकाम पूर्ण करण्याची हीच सुवर्णसंधी आहे. डिझेल-पेट्रोलच्या दरात काही प्रमाणात दिलासा मिळाल्यानंतर आता स्टील निर्यातीवर करशुल्कात वाढ आणि पावसाळी ऋतुला सुरुवात झाल्यामुळे स्वस्तात घर बनवण्यासाठी चांगली वेळ आली आहे. सध्या बाजारात घर बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्यांचे दर घसरले आहेत. त्यात वाळू, सिमेंट, विटा, स्टील, सळ्या यांचा समावेश आहे.
सरकारने स्टील निर्यातीवरील कर वाढवला आहे. त्यामुळे देशातंर्गत बाजारात स्टील उत्पादनात दर घसरले आहेत. लोखंडी सळ्यांच्या किंमतीत झालेल्या घसरणीचं हेच कारण आहे. या दरात कमी आल्यानं एप्रिलमध्ये सळ्यांचे किरकोळ दर ८२ हजार रुपये प्रति टन होते ते आता ६२-६३ हजार प्रति टनपर्यंत घसरले आहेत.
प्रति टन काय होते दर?नोव्हेंबर २०२१ - ७० हजार डिसेंबर २०२१ - ७५ हजार जानेवारी २०२२ - ७८ हजार फेब्रुवारी २०२२ - ८२ हजार मार्च २०२२ - ८३ हजार एप्रिल २०२२ - ७८ हजार मे २०२२ अखेरच्या आठवड्यात - ६२-६३ हजार
उद्योजकांनुसार, सळ्यांसोबत बाजारात सिमेंटचे दर मागील २-३ आठवड्यात ६० रुपयांनी कमी झाले आहेत. बिर्ला सिमेंटच्या एक पोतं ४०० रुपये दराने मिळत होतं आता त्याचे दर ३८० रुपये झाले आहेत. त्याचप्रमाणे बिर्ला सम्राटचा भाव ४४० रुपयांवरून ४२० रुपये झाला आहे. तर एसीसी सिमेंट दर ४५० रुपयांवरून ४४० रुपये झाले आहेत. मात्र सिमेंटचे भाव अद्यापही सर्वसामान्य दराहून जास्त आहेत. येणाऱ्या काळात सिमेंट, सळ्या यासारखे बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्यांचे दर आणखी कमी होऊ शकतात. विशेष म्हणजे सिमेंट दरात पेट्रोल डिझेल स्वस्त होण्याचा परिणाम होईल.
रिअल इस्टेट सेक्टरमध्ये सध्या बिकट परिस्थिती आहे. एकापाठोपाठ एक बांधकाम क्षेत्रातील कंपन्यांचं मोठं नुकसान होत आहे. नवीन प्रकल्प ठप्प झाले आहेत. अनेक जुने प्रकल्प ताटकळत राहिले आहेत. त्यामुळे विट, सिमेंट, सळ्या, वाळूसारखे दर खाली उतरले आहेत. पावसाळी वातावरणात लोकही घर बांधकाम करत नाहीत. त्यामुळे एकंदरित घराच्या बांधकामासाठी लागणारे साहित्यांचे दर कमी झाले आहेत.