- धनाजी कांबळेलाेकमत न्यूज नेटवर्कशाहगंज : आमची जळालेली घरे सरकारने बांधून दिली आहेत. पण आम्हाला सन्मानाने जगण्याचा अधिकार असतानाही प्रत्यक्षात दबावाखाली जगावे लागते, असं डोळ्यात डोळे घालून भदेठी येथील दलित वस्तीतल्या महिला सांगत होत्या. इतक्या दिवसांनंतरही चेहरे भेदरलेले आहेत. महिला डोळ्याला पदर लावतच बोलतात. सत्य सांगतानाही त्यांना मोठी हिंमत करावी लागते, हे त्यांच्या डोळ्यांत दिसत होतं.
ज्यांचे घर जाळले गेले होते, ते फिरतू राम म्हणाले, शेळी चारण्यारून लहान मुलांना मारहाण करण्यात आली होती. त्याचा जाब विचारला म्हणून वाद वाढत गेला आणि अचानक रात्री आमच्या वस्तीतील घरांना आग लावण्यात आली. बायका, पोरं घाबरून जवळच्या वस्तीवर पळून गेले. आम्ही बरेच लोक सकाळीच शेतात गेलो होतो, त्यामुळे घरी येईपर्यंत आम्हाला काहीच कळलं नाही.
उत्तर प्रदेशमधील जौनपूर जिल्ह्यातील भदेठी येथे जून २०२० मध्ये मुलांमध्ये झालेल्या भांडणात मोठ्यांनी उडी घेतल्याने दलितांची घरे जाळण्यात आली होती. आज त्या गावातील पीडितांना घरे बांधून दिली आहेत, मात्र त्यांची जनावरे होरपळून मेली, ती काही परत मिळाली नाहीत.पोलिसांनी या प्रकरणात ३५ जणांना अटक केली होती. अजूनही त्याची केस सुरू आहे, पण प्रत्यक्षात आजही या गावात दोन्ही समाजांत तेढ आणि द्वेषाची भावना आहे. पीडित कुटुंबांना नुकसानभरपाईसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून १० लाखांची आर्थिक मदत सरकारने जाहीर केली होती. त्याचबरोबर मुख्यमंत्री आवास योजनेंतर्गत ७ पीडित कुटुंबांना घरे देण्याचे आश्वासन दिले होते, पण १ लाख ७४ हजार रुपये मिळाले होते. त्यात कर्ज काढून आणखी रक्कम घातली आणि घर बांधले, असे फितूर राम म्हणाले. १५ दिवस वस्तीवर भीतीचे वातावरण होते. कुणी वस्तीवर यायला तयार नव्हते. पुन्हा हल्ला झाला तर काय करायचे, असा प्रश्न होता. पण, हळूहळू भीती कमी झाल्यावर एकेक कुटुंब वस्तीवर परत आले, असे आशादेवी यांनी सांगितले.
निवडणुकीपेक्षा आम्हाला रोजीरोटीची भ्रांत आमच्या राज्यात निवडणूक आहे. मोठमोठ्या गाड्या भुर्रर्र येतात आणि धूळ उडवून निघून जातात. आम्ही सगळ्यांनाच माना डोलवतो, पण निवडणूक येते आणि जाते. आमच्यासमोर निवडणुकीपेक्षा रोजीरोटीचा प्रश्न महत्त्वाचा आहे, असं बारावीपर्यंत शिकलेली फितूर राम यांची सून म्हणाली आणि जमलेल्या सगळ्या महिलांनी माना डोलवून सहमती दर्शविली.