नवी दिल्ली - संपुर्ण देशात उष्णतेचा कहर पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी तर गरमीमुळे गंभीर परिस्थिती आहे. घामाच्या धारा आणि सतत वाढत जाणारे तापमान यामुळे लोकांचे जगणं कठीण झालं आहे. बुलंदशहरमध्ये अशी एक प्राथमिक शाळा आहे जिथे हलगर्जीपणा दिसून आला आहे. कडाक्याच्या उन्हात विद्यार्थ्यांना झाडांच्या साहाय्याने अभ्यास करावा लागत आहे. या विद्यार्थ्यांच्या डोक्यावर छत नाही. तसेच या कडाक्याच्या उन्हापासून बचाव करण्यासाठी कोणतीच व्यवस्था नाही. स्वच्छतेसाठी सुद्धा कोणतीच व्यवस्था करण्यात आलेली नाही.
एकीकडे 'पढेगा इंडिया तो बढेगा इंडिया', असा नारा सरकार देत असताना बुलंदशहरमधील परिस्थिती समोर येत आहे. इतक्या अडचणींमध्ये विद्यार्थी कसे शिकणार आणि पुढे कसे जाणार, अशी चर्चा सुरू आहे. या संपूर्ण परिस्थितीमुळे येथील प्राथमिक शिक्षणाधिकारी अखंड प्रताप सिंह यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीकाही केली जात आहे. डॉक्टर लोकांना उन्हापासून दूर राहण्याचा सल्ला देत आहेत.
शाळेत शिकणारी मुलांवर उन्हापासून वाचत झाडाच्या साहाय्याने अभ्यास करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. शाळेतील जुन्या खोल्यांमुळे त्या पाडण्यात आल्या. मात्र, या विद्यार्थ्यांना दुसऱ्या कोणत्याच इमारतीमध्ये जागा देण्यात आली नाही. तसेच वेळेत शाळेतील वर्गांचे बांधकामही पूर्ण झालेले नाही, असे पहासू नगर येथील क्रमांक 1च्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांचे म्हणणे आहे. याचाच परिणाम असा की, काही विद्यार्थ्यांना झाडाच्या सावलीत शिक्षण घ्यावे लागत आहे तर काही विद्यार्थ्यांना येथील स्वयंपाकघरात शिक्षण घेत आहेत.
विद्यालयाचे मुख्याध्यापक गिरीश कुमार शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, या शाळेत 450 विद्यार्थी शिकत आहेत. शाळेच्या खोल्या मोडकळीस आल्याने त्यांचा लिलाव करून त्या पाडण्यात आल्या. मात्र, त्यानंतर आजपर्यंत येथे खोल्या बांधता आलेल्या नाहीत. तर उन्हामुळे या बालकांचे प्रचंड हाल होत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.