बुलंदशहर : उत्तरप्रदेशमधील बुलंदशहरमध्ये कथित गाईच्या हत्येवरून उसळलेल्या दंगलीवेळी पोलीस निरिक्षकाची गोळी मारून हत्या करण्यात आली होती. या हत्येचा आरोप असलेल्या लष्कराचा जवान जितेंद्र मलिक उर्फ जीतू फौजी याला लष्कराने एसटीएफच्या ताब्यात दिले आहे. यावेळी जीतूने जमावासोबत घटनास्थळी हजर असल्याचे कबूल केले आहे. मात्र, त्यानेच पोलीस निरिक्षकाला गोळी घातल्याचे स्पष्ट झालेले नाही.
एसटीएफचे प्रमुख अभिषेक सिंह यांनी सांगितले की, जेव्हा घटनास्थळी जमाव जमला तेव्हा जीतू तेथे होता, असे त्याने कबूल केले आहे. मात्र, इंस्पेक्टर सुबोध कुमार यांच्यावर गोळी झाडल्याचे प्रत्यक्षदर्शी दिसत नाही. जीतूने गावातील लोकांबरोबर दंगलीवेळी उपस्थित असल्याचे मान्य करतानाचा पोलिसांवर दगडफेक केल्याचा आरोप फेटाळला आहे. जीतूच्या मोबाईलची फॉरेन्सिक तपासणी करण्यार असल्याचे ते म्हणाले.
दुसरीकडे जीतूचा मोठा भाऊही सैन्यात असून पुण्यामध्ये सेवा बजावत आहे. त्याच्या म्हणण्यानुसार जीतू निर्दोष आहे. जीतू 19 नोव्हेंबरपासून सुटीवर होता. तो 4 डिसेंबरला काश्मीरमध्ये पुन्हा रुजू होणार होता. घटनेच्या दिवशी तो घरतून निघाला होता. त्याच्यासोबत मित्रही होते. तेव्हा वाटेत हे गाव लागते. या चिंगरावठी गावामध्ये आल्यावर त्याला जमावातील काहींनी बोलावले. म्हणून तो तिथे गेला होता. याबाबतचे पुरावेही आपल्याकडे असल्याचे जितेंद्र यांनी सांगितले.