लखनौ - गोहत्या झाल्याच्या कारणावरून उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर जिल्ह्यामध्ये उसळलेल्या हिंसाचारात पोलीस निरीक्षक सुबोधकुमार सिंह यांचा मृत्यू झाला होता. मात्र उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पोलीस निरीक्षक सुबोधकुमार सिंह यांची जमावाकडून झालेली हत्या हा अपघात असल्याचं वक्तव्य केलं आहे. एका हिंदी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे. हे वक्तव्य करण्याच्या एक दिवस आधी सिंह यांच्या कुटुंबियांची मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले होते. ही हत्या करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी कुटुंबियांना दिले.
‘उत्तर प्रदेशात जमावाकडून मारहाणीची कोणतीही घटना घडलेली नाही. बुलंदशहरमधील घटना एक दुर्घटना आहे. यामध्ये कायदा आपलं काम करत आहे. दोषींना सोडलं जाणार नाही. गोहत्येवर संपूर्ण उत्तर प्रदेशात बंदी आहे. यासाठी अधिकारी उत्तरदायी असतील’, असं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. पोलिसांनी हत्येच्या आरोपाखाली आणखी पाच जणांना अटक केली आहे. तसेच हिंसाचारात गोळीबार करणाऱ्या जितू नावाच्या लष्करी जवानाचा पोलीस शोध घेत आहेत. तो जम्मूत असल्याची माहिती मिळताच, त्याच्या शोधासाठी पोलीस तिथे गेले आहेत. या हिंसाचारात पोलीस निरीक्षक सुबोधकुमार सिंह यांच्यासह एका तरुणाचा मृत्यू झाला होता.
हिंसाचाराच्या काही व्हिडिओ फिती पोलिसांच्या हाती लागल्या होत्या. त्या बारकाईने पाहिल्यानंतर त्यात एक लष्करी जवान गोळीबार करीत असल्याचे दिसले होते. त्याचे नाव जितू असून, एफआयआरमध्ये त्याचा उल्लेख आहे. त्याने झाडलेल्या गोळ्यांनीच सुबोधकुमार सिंह व सुमितकुमार या युवकाचा मृत्यू झाला असावा, असा पोलिसांना संशय आहे. हा जवान बुलंदशहर जिल्ह्यातील मूळ रहिवासी आहे. हिंसाचारानंतर हा लष्करी जवान तिथून गायब झाला आहे. हा जवान सुट्टी घेऊन गावी परतला होता व त्यानंतर पुन्हा जम्मूमध्ये आपल्या कामाच्या ठिकाणी हजर झाला, असे त्याच्या कुटुंबियांनी सांगितले; मात्र तो अद्याप रुजू झालेला नसल्याचे लष्करी अधिकाऱ्यांनी पोलिसांना सांगितले आहे. हिंसाचारासंदर्भात हाती लागलेल्या व्हिडिओमधील सर्व आरोपींचा कसून शोध सुरू आहे.
एकाच पिस्तुलाने दोघांची हत्या
पोलीस निरीक्षक सुबोधकुमार सिंह व सुमितकुमार यांची हत्या एकाच प्रकारच्या पिस्तुलाने झाली आहे. ते 0.32 बोअर प्रकारातील पिस्तूल असावे, असा कयास आहे. सुबोधकुमार सिंह यांच्याकडे याच प्रकारचे सर्व्हिस पिस्तूल होते. हिंसाचार करणाऱ्यांनी ते पिस्तूल पळविल्याचा संशय आहे. गोहत्या केल्याच्या कारणावरून जमावाने सुमारे तीन तास हिंसाचार चालविला होता. त्यांची पोलीस व सुरक्षा दलाच्या जवानांशी चकमक झाली. जमावाने वाहने व एक पोलीस चौकीही जाळली.