Bulldozer in Shaheen Bagh: नवी दिल्लीतील ज्या शाहीनबागमध्ये नागरिकत्व कायद्या(CAA)विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले होते. त्याच शाहीनबागमध्ये आता परत एकदा आंदोलनाची सुरुवात झाली आहे. यावेळी हे आंदोलन अतिक्रमणाविरोधात कारवाई करणाऱ्या दक्षिण दिल्ली महानगरपालिकेवुरुद्ध (SDMC) सुरू आहे. महापालिकेचे एक पथक सकाळी बुलडोझरसह पोहोचले होते, परंतु स्थानिकांनी याला तीव्र विरोध केला. आता सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर अतिक्रमणाची मोहीम थांबवून बुलडोझर परत पाठवण्यात आले आहेत.
या कारवाईदरम्यान अनेक स्थानिकांनी स्वत:हून त्यांची तात्पुरती बांधकामे हटवली आहेत. आम आदमी पक्षाचे (AAP) स्थानिक आमदार अमानतुल्ला खान यांनीदेखील मार्केट असोसिएशनशी समन्वय साधून तात्पुरती बांधकामे हटवण्यास सहमती दर्शवली आहे. या हायव्होल्टेज ड्रामाच्या दरम्यान राजकीय पक्षांचे लोकही तेथे जमले होते. या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी अतिक्रमण हटविण्यास विरोध केला. मात्र, आंदोलन करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी तेथून हटवले. महिलांसह मोठ्या संख्येने स्थानिक लोकांनीही एमसीडीच्या कारवाईला विरोध केला आणि लोक बुलडोझरसमोर बसले. अमानतुल्ला खान हेही अतिक्रमण हटाव कारवाईचा निषेध करण्यासाठी पक्षीय फौजफाट्यासह तेथे पोहोचले. अतिक्रमण हटवण्याच्या बहाण्याने भाजप राजकारण करत असल्याचा आरोप अमानतुल्ला खान यांनी केला. शाहीन बागेत कुठेही अवैध अतिक्रमण नाही, असे ते म्हणाले. जे काही बेकायदेशीर बांधकामे आहेत, ती आपण स्वत: हटवल्याचे त्यांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वी दक्षिण कॉर्पोरेशनमधील स्थायी समितीचे उपाध्यक्ष राजपाल सिंह यांनी सांगितले होते की, एसडीएमसी दक्षिण दिल्लीतील अनेक भागांमध्ये 4 मे ते 13 मे या कालावधीत बेकायदा बांधकामे पाडण्याची मोहीम सुरू करणार आहे. या संदर्भात एसडीएमसीने दक्षिण आणि दक्षिण पूर्व डीसीपींना पत्र लिहिले होते. जहाँगीर पुरीमध्ये बुलडोझरच्या कारवाईनंतर दिल्ली महानगरपालिकेचे महापौर आणि अधिकारी अनेक भागातील अवैध धंदे हटवण्याच्या तयारीत आहेत.