41 लोकांचे प्राण वाचवणाऱ्या रॅट मायनरच्या घरावर बुलडोझर; विरोधकांचा सरकारवर घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 02:53 PM2024-02-29T14:53:35+5:302024-02-29T14:54:45+5:30
गेल्या वर्षी उत्तरकाशीतील बोगड्यात अडकलेल्या 41 कामगारांचे प्राण वाचवणाऱ्या रॅट मायनर वकील हसन यांच्या घरावर दिल्ली डेव्हलपमेंट अथॉरिटीने बुलडोझर चालवले.
नवी दिल्ली: गेल्या वर्षी उत्तरकाशीतील बोगड्यात अडकलेल्या 41 कामगारांचे प्राण वाचवणाऱ्या रॅट मायनर वकील हसन यांच्या घरावर दिल्ली डेव्हलपमेंट अथॉरिटी (DDA) ने बुलडोझर चालले. DDA ने बुधवारी खजुरी खास भागात अनेक घरे पाडली, ज्यात रॅट मायनगर कामगार वकील हसन यांच्याही घराचा समावेश होता. या कारवाईनंतर विरोधकांनी सरकारवर टीका करणे सुरू केले आहे. तसेच, अधिकाऱ्यांवर कोणतीही सूचना न देता घर पाडल्याचा आरोप वकील हसन यांनी केला आहे.
या घटनेनंतर काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये या प्रकरणावरुन प्रश्न उपस्थित केले. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये वकील हसनच्या पत्नीचे वक्तव्य लिहिले, “माझे पती एक नायक होते. त्यांनी उत्तरकाशीतील 41 लोकांचे प्राण वाचवले. सर्वजण त्यांचा आदर करतात. आज त्या सन्मानाच्या बदल्यात त्यांनी माझे घर पाडले.” यानंतर प्रियंका गांधी यांनी लिहिले की, वकील हसन यांनी आपला जीव धोक्यात घालून उत्तरकाशी बोगद्यात अडकलेल्या कामगारांचे प्राण वाचवले. प्रसिद्धीसाठी भाजपच्या बड्या नेत्यांनी त्यांच्यासोबत फोटो क्लिक केले. आता मोहीम संपल्यानंतर हसन यांना पोलीस ठाण्यात कोंडून त्यांचे घर पाडण्यात आले. गरिबांची घरे पाडणे, त्यांना चिरडणे, त्यांचा छळ करणे, अपमान करणे...हेच भाजपचे सत्य आहे. या अन्यायाला जनता नक्कीच उत्तर देईलस अशी टीका त्यांनी केली.
“मेरे हसबैंड तो हीरो थे उत्तरकाशी के… 41 लोगों की जान बचाई थी उन्होंने… सब उन्हें सम्मान दे रहे थे। आज उस सम्मान के बदले मेरा मकान ले लिया!”
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) February 29, 2024
वकील हसन ने अपनी जान जोखिम में डालकर उत्तरकाशी सुरंग में फंसे मजदूरों की जान बचाई थी। तब अपने प्रचार के लिए भाजपा के बड़े-बड़े नेताओं… pic.twitter.com/7exJnU5F9f
तर, डीडीएवर प्रश्न उपस्थित करत काँग्रेसचे खासदार इम्रान प्रतापगडी यांनी सोशल लिहिले की, गेल्या वर्षी उत्तरकाशीमध्ये अडकलेल्या 41 लोकांचे प्राण वाचवणाऱ्या वकील हसन यांना बक्षीस देण्याऐवजी त्यांच्या घरावर बुलडोझर चढवण्यात आला. तुमच्या अधिकाऱ्यांना विशिष्ट जातीमध्ये रस आहे का? तुम्ही मानसिकतेचे बळी आहात का? पंतप्रधान मोदींना टॅग करत काँग्रेस नेत्याने प्रश्न विचारला की, मोदीजी, दिल्लीत जे काही चालले आहे, त्यावर तुमची निर्विवाद संमती मानावी का?
आम आदमी पार्टीची टीका
दिल्ली सरकारचे मंत्री सौरभ भारद्वाज यांनीही या प्रकरणावर सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले की, गेल्या दीड वर्षात डीडीए, एएसआय, एलएनडीओ आणि रेल्वेसारख्या केंद्रीय एजन्सींनी दिल्लीत 3 लाखांहून अधिक लोकांना बेघर केले आहे. पुनर्वसनाची कोणतीही योजना नसल्यामुळे ते कोर्टात हेलपाटे मारत आहेत. बेघर लोक फूटपाथ, उड्डाणपूल आणि रात्रीच्या निवाऱ्यावर आसरा घेताना दिसतात. अशा प्रकारे भाजप नियंत्रित एजन्सी दिल्ली शहराची नासधूस करत आहेत.
पिछले साल उत्तरकाशी में फंसे 41 लोगों की जान बचाने वाले रैट माइनर वकील हसन के मकान को बुलडोजर से ढहा दिया गया है।@official_dda ने नोटिस तक नहीं दिया, बुलडोज़र तब चलाया गया जब वकील के बच्चे उनके घर पर अकेले थे। वकील और उनके साथियों ने अपनी जान की बाज़ी लगा कर उन 41 लोगों को बचाया… pic.twitter.com/mVSjOrvLG4
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) February 29, 2024
ओवेसींचा घणाघात
ओवेसी यांनीही यावरुन सरकारवर टीका केली. डीडीएने रॅट मायनर वकील हसन यांना कोणतीही पुर्वसूचना न देता त्यांचे घर बुलडोझरने पाडले. हसन यांची मुले घरात एकटी असताना बुलडोझर घरावर चालवला. हसन यांनी जीव धोक्यात घालून त्यांना वाचवले. 41 कामगारांचे प्राण वाचवणाऱ्यांना कोणत्याही सुसंस्कृत समाजात नायकाचा दर्जा दिला गेला असता. पण कदाचित त्यांचे नाव वकील हसन आहे, त्यामुळेच मोदींच्या राजवटीत त्यांना फक्त बुलडोझर, एन्काउंटर वगैरे शक्य आहे, अशी टीका त्यांनी केली.
गृहनिर्माण योजनेंतर्गत घरे देणार
याप्रकरणी भाजप नेते मनोज तिवारी म्हणाले की, त्यांच्या घराबाबत काही कायदेशीर अडचणी होत्या. याबाबत आम्ही चर्चा केली असून त्यांना आम्ही प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घर देऊ.