Bullet Bike Blast: तुम्ही अनेकदा कार आणि इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागण्याच्या घटना पाहिल्या किंवा ऐकल्या असतील. पण आता रॉयल एनफिल्ड बुलेटला आग लागल्याची घटना समोर आली आहे. रस्त्यावर धावणाऱ्या बुलेटच्या इंजिनला अचानक आग लाग लागली आणि काही वेळातच दुचाकी जळून खाक झाली. या अपघातात 1 जणाचा मृत्यू झाला, तर 9 जण गंभीररीत्या भाजले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ही घटना हैदराबादच्या मोगलपुरा भवानीपुरा परिसरात घडली. व्होल्टा हॉटेलजवळ धावत्या बुलेटच्या इंजिनला अचानक आग लागली. आग लागताच चालकाने दुचाकीवरुन उडी मारुन जीव वाचवला. यावेळी घटनास्थळी उपस्थित लोकांनी दुचाकीची आग विझवण्यास सुरुवात केली. यादरम्यान बाईकच्या पेट्रोल टाकीचा अचानक स्फोट झाला. यात एकाचा मृत्यू झाला, तर इतर 9 जण गंभीररीत्या भाजले.
बुलेटला आग का लागली?मीडियाशी बोलतना भवानीपुरा पोलिस स्टेशनचे इन्स्पेक्टर बालस्वामी म्हणाले, बुलेटला आग लागण्याचे कारण शोधले जात आहे. मात्र प्रथमदर्शनी हे इंजिन गरम झाल्यामुळे घडले असण्याची शक्यता आहे. आग लागल्यानंतर ती विझविण्यासाठी स्थानिक नागरिक पुढे आले आणि त्यांनी दुचाकीवर पाणी व वाळू टाकण्यास सुरुवात केली. मात्र अचानक बाईकच्या पेट्रोल टाकीत मोठा स्फोट झाला आणि शेजारी उभे असलेले लोक गंभीर जखमी झाले. आज सकाळी रुग्णालयात उपचारादरम्यान या अपघातातील एकाचा मृत्यू झाला, तर इतर 9 जणांवर उपचार सुरू आहेत.