समृद्धी महामार्गाच्या निर्माणाधीन पूल कोसळून काही दिवसांपूर्वी मोठी दुर्घटना घडली होती. आता बुलेट ट्रेनच्या निर्माणाधीन पुलावर अपघात झाला आहे. क्रेनमध्ये बिघाड होऊन गर्डर कोसळल्याने एका मजुराचा मृत्यू झाला आहे. तर सहा जण जखमी झाले आहेत. गुजरातमध्ये ही घटना घडली आहे.
बडोदा जिल्ह्यातील करजन तालुक्यात बुलेट ट्रेनच्या पुलाचे काम सुरु आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनास्थळी बचावकार्य सुरु असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. हायस्पीड रेल कॉर्पोरेशनतर्फे मुंबई-अहमदाबाद दरम्यान बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम जोरात सुरू आहे. करजन तालुक्यात तालुक्यातील मंगरोळ सापा पाटियाजवळ काम सुरु आहे. मोठ्या क्रेनद्वारे गर्डर बसवण्यात येत आहेत. यावेळी ही दुर्घटना घडली आहे. जखमींना उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.
लाँचिंग गॅन्ट्री गर्डर ट्रान्सपोर्टरच्या वरच्या बाजूला लाँचिंगच्या ठिकाणी हलवण्यात आली आणि गर्डर ट्रान्सपोर्टरमधून सेल्फ-अनलोडिंग करत असताना फ्रंट सपोर्ट (FS) चा व्हील बेस जाम झाला आणि त्यामुळे लॉन्चिंग गॅन्ट्रीचा एक भाग बिघडला. व्हील बेस तपासण्याचा प्रयत्न करत असलेल्या एका कामगाराचा अडकून मृत्यू झाला. किरकोळ जखमी झालेल्या इतर सहा कामगारांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे एनएचएसआरसीएलने म्हटले आहे.