अहमदाबाद, दि. 14 - भारतासाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. बुलेट ट्रेनच्या निमित्ताने नवभारताची मुहूर्तमेढ रोवली जात आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुलेट ट्रेनच्या पायाभरणी सोहळयात बोलताना म्हणाले. अहमदाबादमध्ये आज बुलेट ट्रेन प्रकल्पाचे भूमिपूजन सुरु आहे. बुलेट ट्रेनमुळे देशाला फायदा होईलच पण महाराष्ट्र आणि गुजरातला फायदा होईल. यामुळे रोजगार निर्मिती होईल असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी जपानचेही आभार मानले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मदतीमुळे जपानने 30 हजार कोटी रुपये महाराष्ट्राला दिले त्यामुळे महाराष्ट्रात विकास प्रकल्प सुरु आहेत. जपान भारताचा जवळचा मित्र आहे असे फडणवीस म्हणाले. बुलेट ट्रेनचे भूमिपूजन अहमदाबादमध्ये होतेय पण बुलेट ट्रेनचे उद्घाटन मोदींनी मुंबईत करावे असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
हा ५०८ किमीचा हा मार्ग २०२२ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. यासाठी ७०० हेक्टरहून अधिक जमीन संपादित करण्यात येणार असून, ठाणे-वाशी भागातून ७ किमी समुद्राखालून ही रेल्वे धावणार आहे. याशिवाय ही रेल्वे मुंबईतून १५ किमी भूमिगत मार्गाने जाणार आहे.हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची (एचएसआरसी) ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. एचएसआरसीचे अधिकारी हा प्रस्तावित मार्ग असल्याचे सांगत असले, तरी याला मंजुरी मिळणे ही औपचारिकता आहे.
या मार्गाचे हवाई आणि भूभौतिक सर्वेक्षण झाले आहे. त्यानंतर, वाशी ते ठाणे हा मार्ग पाण्याखालून करण्यात यावा, असा निर्णय झाला. या योजनेसाठी गुजरातमध्ये ७०० हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे. ही प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी अधिकारी एक सर्वेक्षण करणार आहेत. बडोदा शहराजवळ ही रेल्वे ४५ डिग्रीचे वळण घेणार आहे. अहमदाबाद, बडोदा आणि सूरतमध्ये खासगी संपत्तींना याची झळ बसणार आहे. बहुतांश जमीन आनंद, नडियाद आणि अंकलेश्वर येथील आहे.
बडोद्यात ट्रेनिंग सेंटरबडोदा येथे ६०० कोटी रुपये खर्च करून, ट्रेनिंग सेंटर सुरू करण्यात येणार असल्याची माहिती, हाय स्पीड रेल कॉर्पोरेशनने दिली. एनएचएसआरसीचे कार्यकारी संचालक आचल खरे यांनी सांगितले की, नॅशनल अकॅडमी ऑफ इंडियन रेल्वेच्या पाच हेक्टर जमिनीवर केंद्र उभारण्यात येईल. डिसेंबर २०२० पर्यंत हे केंद्र सुरू होईल.