Gujarat News :गुजरातमधील आणंद जिल्ह्यात सोमवारी एक भीषण अपघात झाला. बुलेट ट्रेन प्रकल्पाचा बांधकाम सुरू असलेला पूल कोसळला. पूल कोसळल्याने कामगार ढिगाऱ्याखाली गाडले गेले. अपघाताची माहिती मिळताच आणंद पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले. यातील दोन मजुरांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, तिसऱ्याला वाचवण्यात यश आले. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य वेगाने सुरू आहे.
अपघाताची माहिती मिळताच नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे अधिकारीही घटनास्थळी पोहोचले. नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने या दुर्घटनेवर एक निवेदन जारी करून सांगितले की, आणंद येथील बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या बांधकामाच्या ठिकाणी काँक्रीटचे ब्लॉक कोसळल्यामुळे हा अपघात घडला. मदत आणि बचाव कार्य सुरू असूण आणंद पोलीस आणि अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी हजर आहेत.
बुलेट ट्रेनसाठी गुजरातमध्ये 20 पूल बांधले जात आहेतमही नदीवर बांधण्यात येत असलेला पूल कोसळल्याने ही दुर्घटना घडली आहे. दरम्यान, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉरसाठी वापी आणि सुरत बुलेट ट्रेन स्थानकांदरम्यान नऊ नदी पुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. गुजरातमध्ये नदीवर 20 पूल बांधले जाणार आहेत. त्यापैकी 12 नदीवर पूल बांधण्यात आले आहेत. नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान भारतातील पहिली 508 किमी लांबीची हायस्पीड रेल्वे लाइन असेल.
508 किमी लांबीचा बुलेट ट्रेन मार्ग508 किमी मार्गापैकी 351 किमी गुजरातमधून तर 157 किमी महाराष्ट्रातून जाणार आहे. एकूण 92% म्हणजेच 468 किमी लांबीचा ट्रॅक एलिव्हेटेड असेल. तसेच, मुंबईतील सात किमीचा भाग समुद्राखालून जाईल. याशिवाय, बोगद्यातून 25 किमी आणि जमिनीवरुन 13 किमीचा मार्ग असेल. बुलेट ट्रेन 70 महामार्ग आणि 21 नद्या पार करेल. या मार्गासाठी 173 मोठे आणि 201 छोटे पूल बांधले जात आहेत.