नवी दिल्ली : मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर सहा वर्षांत पूर्ण करण्यात येणार असून, त्याचे भाडे विमान भाड्याहून कमी राहील, अशी माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी बुधवारी दिली. लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात ते म्हणाले की, हायस्पीड रेल्वेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प व्यवहार्य असून तो फायदेशीर ठरेल. हायस्पीड रेल्वे ३५० कि.मी. प्रतितास या वेगाने मुंबई-अहमदाबाद हे ५०८ कि.मी.चे अंतर दोन तासांत कापेल, अशी अपेक्षा आहे. या दोन आर्थिक केंद्रांदरम्यान सध्या धावणाऱ्या दुरांतो एक्स्प्रेसला हे अंतर कापण्यास सात तास लागतात. हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी प्रचंड निधी देण्यात आल्यामुळे देशाच्या इतर भागांतील प्रकल्पांची कामे रखडू शकतात याकडे लक्ष वेधले असता प्रभू म्हणाले की, कोणताही प्रादेशिक भेदभाव करण्यात आलेला नाही. प्रत्येक राज्याला यापूर्वीपेक्षा दुप्पट निधी देण्यात आला आहे. मुंबई-अहमदाबाद या ५०८ कि.मी. लांबीच्या हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर प्रकल्पाचा अंदाजित खर्च ९७ हजार ६३६ कोटी असून यातील ८१ टक्के निधी जपानकडून कर्जाच्या स्वरूपात मिळणार आहे. यासंदर्भात जपानसोबत झालेल्या करारानुसार, भारताला हायस्पीड रेल्वेचे डबे, विद्युतप्रणाली, सिग्नल यंत्रणा यासारखी इतर उपकरणे जपानकडून खरेदी करावी लागतील. अंदाजित खर्चात प्रत्यक्ष कामादरम्यान प्रकल्पाचा वाढणारा खर्च, व्याज व आयात शुल्काचा समावेश आहे. जपानने यासाठी ०.१ टक्के व्याजदराने ५० वर्षांसाठी कर्ज दिले आहे. >रेल्वेने हायस्पीड व सेमी हायस्पीड रेल्वे चालविण्याचे धोरण आखले असून, या रेल्वे मार्गांच्या व्यवहार्यता तपासण्याचे काम विविध रेल्वे कंपन्यांना देण्यात आले आहे, असे प्रभू म्हणाले. दिल्ली-मुंबई हायस्पीड कॉरिडारचे काम थर्ड रेल्वे सर्व्हे, डिझाईन इन्स्टिट्यूट आॅफ ग्रुप कॉर्पोरेशन आणि लाहमेयेर इंटरनॅशनल या कंपन्यांच्या महासंघाला देण्यात आले आहे.
बुलेट ट्रेनचे भाडे विमान भाड्याहून कमी
By admin | Published: July 21, 2016 4:53 AM