अहमदाबाद: मुंबई-अहमदाबाददरम्यानच्या प्रस्तावित बुलेट ट्रेनमधून दररोज ८८,००० ते १,१८,००० प्रवाशांनी प्रवास केला अथवा या अतिजलद गाडीने १०० फेऱ्या घातल्या तरच हा रेल्वे प्रकल्प आर्थिकष्दृट्या व्यवहार्य ठरू शकतो, असा दावा आयआयएम अहमदाबादने (भारतीय व्यवस्थापन संस्था) आपल्या अहवालात केला आहे.‘डेडिकेटेड हायस्पीड रेल्वे नेटवर्क इन इंडिया: इशूज इन डेव्हलपमेंट’ या मथळ्याखाली तयार करण्यात आलेल्या या अहवालानुसार रेल्वेला कर्ज आणि व्याजाच्या रक्कमेची निर्धारित कालावधीत परतफेड करण्याकरिता रेल्वे सुरू झाल्यावर १५ वर्षांपर्यंत ३०० किमीच्या प्रवासासाठी तिकिटाची किंमत १५०० रुपये ठेवावी लागणार असून दररोज ८८००० ते ११८००० प्रवाशांची वाहतूक करावी लागेल. असा आहे जपानचा प्रस्तावजपानने या रेल्वेप्रकल्पासाठी येणाऱ्या एकूण खर्चाच्या ८० टक्के हिस्सा म्हणजेच ९७,६३६ कोटी रुपयांचे कर्ज सवलतीच्या व्याजदरात देण्याचा प्रस्ताव मांडला आहे. जपानच्या प्रस्तावानुसार हे कर्ज ५० वर्षांच्या आत फेडावे लागेल आणि परिचालन सुरू झाल्यानंतर १६ व्या वर्षापासून ०.१ टक्के दराने व्याज द्यावे लागेल.उर्वरित २० टक्के कर्जासाठी व्याजाचा दर ८ टक्के असेल. जपानने कर्ज परतफेडीसाठी १५ वर्षांची सवलत दिली असल्याने रेल्वेला १६ व्या वर्षापासून महसुलाची चिंता राहणार असल्याचे या अहवालात नमूद आहे. ही गाडी एकूण ५३४ किमीचा पल्ला गाठणार आहे.हा अहवाल आयआयएम अहमदाबादच्या सार्वजनिक व्यवस्था समूहाचे प्रोफेसर जी. रघुराम आणि प्रशांत उदयकुमार यांनी संयुक्तपणे तयार केला आहे. (वृत्तसंस्था)
बुलेट ट्रेनला दररोज घालाव्या लागतील १०० फेऱ्या
By admin | Published: April 19, 2016 3:13 AM