नवी दिल्ली : मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान धावणाऱ्या देशातील पहिल्या ‘बुलेट ट्रेन’चे भाडे रेल्वेच्या वातानुकूलित पहिल्या वर्गाच्या प्रचलित भाड्याच्या दीडपट ठेवण्याचा प्रस्ताव आहे, अशी माहिती सरकारने बुधवारी संसदेत दिली.भारतीय रेल्वेच्या दुरान्तो एक्स्प्रेसचे मुंबई-अहमदाबाद प्रवासाचे सध्याचे वातानुकूलित पहिल्या वर्गाच्या प्रवासाचे भाडे २,२०० रुपये आहे. म्हणजेच पूर्णपणे स्वतंत्र मार्गावरून भन्नाट वेगाने धावणाऱ्या बुलेट ट्रेनचे याच प्रवासाचे भाडे सुमारे ३,३०० रुपये असेल. जपानमध्ये ‘शिंकान्सेन’ नावाच्या अशाच बुलेट ट्रेन धावतात. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी जपानचे हेच तंत्रज्ञान वापरले जाणार आहे व या नव्या रेल्वेच्या बांधणीसाठी जपान सरकार अत्यल्प व्याजदराने वित्तसाह्यही देणार आहे. मुंबई-अहमदाबाददरम्यानचे अंतर ५०८ किमी आहे. साधारण तेवढ्याच अंतरासाठी जपानमध्ये तोक्यो ते ओसाका शहरांमध्ये धावणाऱ्या शिकान्सेनचे सध्याचे भाडे भारतीय चलनात रूपांतर केले तर सुमारे ८,५०० रुपये आहे. जपानच्या वित्तसाह्याने भारतात धावणाऱ्या ‘बुलेट ट्रेन’चे भाडे जपानच्या तुलनेत निम्म्याहून कमी असणार आहे!रेल्वे राज्यमंत्र्यांनी बुलेट ट्रेनविषयी दिलेली अन्य ठळक माहिती अशी -- पहिल्या टप्प्यात कमाल वेगक्षमता ताशी ३५० किमी, प्रत्यक्ष धावण्याचा वेग ताशी ३२० किमी- मार्गावर मुंबई, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलिमोरा, सूरत, भजोच, बडोदा, आणंद, अहमदाबाद व साबरमती अशी एकूण १२ स्टेशन्स- प्रकल्पाचा एकूण अपेक्षित खर्च ९७,६३६ कोटी रुपये- गाडी सर्व स्थानकांवर थांबल्यास प्रवासाचा वेळ 2.58 तास. काही स्थानके वगळून जलद धावल्यास २ तास ७ मिनिटे
बुलेट ट्रेनचे नियोजित भाडे ३,३०० रुपये
By admin | Published: May 05, 2016 4:05 AM