नवी दिल्ली- नियंत्रण रेषेवर शत्रूंना तोंड देणारे आणि देशांतर्गत दहशतवाद्यांशी दोन हात करणाऱ्या जवानांची बुलेटप्रूफ जॅकेट निकृष्ट दर्जाची असल्याचं धक्कादायक वास्तव आता समोर आलं आहे. चीनकडून आयात केलेल्या निकृष्ट दर्जाच्या मालानं ही बुलेटप्रूफ जॅकेट तयार करण्यात येत आहेत. निधड्या छातीनं दहशतवाद्यांना सामोरे जाणाऱ्या जवानांच्या छातीवर घालण्यात आलेल्या जॅकेटचा दर्जा निकृष्ट असल्यानं अनेक स्तरांतून याच्या तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. पण सरकारच्या मते या जॅकेटच्या दर्जाविषयी शंका उपस्थित करण्यासारखं काहीही नाही.नीती आयोगाचे सदस्य आणि माजी डीआरडीओ प्रमुख व्ही. के. सारस्वत यांनी रविवारी सांगितलं की, भारतीय कंपन्या या जॅकेटमध्ये चिनी मालाचा वापर जॅकेटची किंमत आवाक्यात राहावी यासाठी करत आहेत. सारस्वत यांनी भारतीय लष्कराला पुरवण्यात येणाऱ्या जॅकेटमध्ये वापरण्यात येणाऱ्या हलक्या दर्जाच्या मालासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. त्याला उत्तर देताना ते म्हणाले, चिनी मालानं बनवण्यात आलेली ही जॅकेट्स सुरक्षेच्या मापदंडात न बसल्यास प्रश्न उपस्थित होऊ शकतो. पण ती सुरक्षेच्या मापदंडात बसत आहेत. तसेच या जॅकेटसंदर्भात चिंता करण्यासारखी कोणतीही बाब अद्याप समोर आलेली नाही, याचा उल्लेखही सारस्वत यांनी केला आहे.नीती आयोगानं हलक्या वजनाची सुरक्षा कवच (बुलेटप्रूफ जॅकेट) भारतातच बनवण्यासाठी एक रोडमॅप बनवण्यास सांगितला आहे. भारतीय मानक ब्युरो(बीआयएस)नं भारतीय लष्कराच्या वापरात असलेल्या सुरक्षा कवचांची गुणवत्ता तपासली आहे. तत्पूर्वी भारतीय कंपन्या बुलेटप्रूफ जॅकेटसाठी कच्चा माल अमेरिका किंवा युरोपिय देशांतून खरेदी करत होत्या. परंतु या देशांतून येणाऱ्या कच्च्या मालाच्या तुलनेत चीनकडून येणाऱ्या कच्च्या मालाच्या किमती कमी आहेत. त्यामुळे बऱ्याच कंपन्या या चीनकडून कच्चा माल खरेदी करण्याला प्राधान्य देत आहेत. सुरक्षा जवानांना हवीत 3 लाखांहून अधिकची जॅकेट्सभारतीय जवानांना 3 लाखांहून अधिक हलक्या वजनाच्या जॅकेटची गरज आहे. या आकड्यानुसारच भारतीय कंपन्यांनी या जॅकेटसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची ऑर्डर दिली आहे. सध्या भारतीय जवान वापरत असलेले जॅकेट हे वजनानं जड आहे. त्यामुळे बऱ्याच काळापासून हलक्या जॅकेटची मागणी होत आहे. कानपूरची एमकेयू आणि टाटा अडवान्स मटेरियल्ससह जास्त करून भारतीय कंपन्या विविध देशातील सैन्याला बुलेटप्रूफ जॅकेट बनवून देतात.
हलक्या दर्जाच्या चिनी मालानं तयार होतंय भारतीय लष्कराचं बुलेटप्रूफ जॅकेट, कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2019 9:47 PM