Bullock Cart Race : बैलगाडा शर्यत बंदी विरोधातील दाखल याचिकेवरील अंतिम सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरू झाली आहे. या शर्यतीला याआधी केंद्रीय प्राणी कल्याण मंडळानं (अॅनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडिया) विरोधा केला होता. पण आता बोर्डाचा विरोध नसल्याचं प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू होण्याच्या मार्गातील महत्वाचा अडथळा आता दूर झाला आहे.
महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यत, तामिळनाडूतील जल्लीकटू व रेकला रेस, तर कर्नाटकमधील कंबाला शर्यतीवर त्या राज्यांनी केलेल्या कायद्यांबाबत सर्वोच्च न्यायालयात ही सुनावणी झाली. ‘बैलगाडा शर्यतींवर बंदी घालण्याची गरज नाही‘, असे सांगणारे प्रतिज्ञापत्र ॲनिमल वेल्फेअर बोर्डानं सादर केलं आहे. आता याबाबतच्या याचिकांवरील पुढील सुनावणी २९ नोव्हेंबरला होणार आहे.
न्या. के. एम. जोसेफ यांच्या नेतृत्वाखालील घटनापीठासमोर काल जलीकट्टू आणि बैलगाडा शर्यतींबाबत दाखल विविध याचिकांवर एकत्रित सुनावणी पार पडली. न्या. अजय रस्तोगी, न्या. अनिरुद्ध बोस, न्या. ऋषिकेश रॉय, न्या. सी. टी. रवीकुमार यांचाही घटनापीठात समावेश आहे. यापूर्वी बैलगाडा शर्यतींना न्यायालयाने सशर्त परवानगी दिली होती. पण त्यानंतर याविरोधात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आल्या होत्या.