नवी दिल्ली - नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता एक खूशखबर आहे. 2022 मध्ये नोकऱ्यांच्या संधींमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोरोनाचे सावट दूर होत असून, उद्योगधंद्यांना गती येत आहे. परिणामी उत्पादन वाढले असून, येणाऱ्या काळात विविध क्षेत्रात मोठ्याप्रमाणात नोकऱ्या उपलब्ध होऊ शकतात असा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तवला जात आहे. मात्र कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमायक्रॉनने चिंता वाढवली आहे. देशात शिरकाव केला आहे. ओमायक्रॉनमुळे तिसरी लाट आल्यास परिस्थिती विपरीत असू शकते, असं देखील तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सध्या सामना करत आहे. 2020 पासून देशावर कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये लावण्यात आलेल्या लॉकडाऊनचा उद्योगधंद्यांना प्रचंड फटका बसला. उत्पादन ठप्प झाल्याने, उद्योग बंद करण्याची वेळ आली. उद्योगधंदे आर्थिक डबघाईला आल्याने अनेकांनी आपले रोजगार गमावले. मात्र आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. उद्योगधंदे पुन्हा एकदा सुरू झाले आहे. मात्र तरी देखील अद्यापही रोजगार म्हणावा असा वाढला नाही. फार्म टीमलीज सर्व्हिसेसचे प्रमुख बालासुब्रमण्यन यांनी कोरोनाच्या सावटातून सध्या तरी आपण बाहेर येत आहोत. उद्योगधंदे पूर्वपदावर आल्याने त्यांना देखील अतिरिक्त मनुष्यबळाची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे पुढील वर्ष हे रोजगारासाठी अनुकूल असेल असं म्हटलं आहे.
SHRM इंडियाचे ज्येष्ठ सल्लागार नित्य विजयकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनचा मोठा फटका हा जागतिक अर्थव्यवस्थेला बसला होता. लाखो लोकांनी आपले रोजगार गमावले होते. मात्र आता परिस्थिती हळूहळ सुधारत आहे. लॉकडाऊनमध्ये देण्यात आलेल्या शिथिलतेनंतर उद्योगधंदे सुरू झाले आहेत. रोजगार देखील वाढले आहेत. येत्या वर्षात त्यामध्ये आणखी वाढ होऊ शकते. कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये झालेली घट आणि वाढते लसीकरण या दोन गोष्ट रोजगाराच्या पथ्यावर पडणाऱ्या आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.