नवी दिल्ली, दि. 8 - विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन केंद्रीय नागरिक उड्डाण मंत्रालयाने पहिल्या नो-फ्लाय लिस्टचे नियम जारी केले आहेत. शुक्रवारी केंद्रीय उड्डाण मंत्री अशोक गजपती राजू यांनी या नियमांची घोषणा केली आहे. विमानात गैरव्यवहार करणाऱ्या प्रवाशांवर कायदेशीर कारवाई व्यतिरिक्त विशेष कारवाई केली जाणार आहे. नो-फ्लाय लिस्टच्या नियमांची तीन विभागांत वर्गवारी करण्यात आली आहे. ज्यामध्ये विमान प्रवासात गैरव्यवहार करणाऱ्या प्रवाशावर बंदी घातली जाऊ शकते. विमानतळावर एखाद्या प्रवाशानं जिवे मारण्याच्या धमकीसह हंगामा केल्यास त्याच्या विमान प्रवासावर दोन वर्षांपर्यंत प्रतिबंध घालण्यात येणार आहे. प्रवाशांचे सुरक्षाकडे मजबूत करण्यासाठी आम्ही नो-फ्लाय लिस्टचे नियम जाहीर केल्याची माहिती केंद्रीय उड्डाण राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी दिली आहे. नो-फ्लाय लिस्टच्या नियमांची तीन विभागांत वर्गवारी करण्यात आली आहे. पहिल्या भागात अपशब्द वापरणा-यांसह विमानात हंगामा करणा-यांना टाकण्यात आलं आहे. अशा प्रवाशांवर तीन महिन्यांपर्यंत बॅन लावलं जाऊ शकतं. तर दुस-या भागात शारीरिकरीत्या दुष्कर्म करणा-या प्रवाशांना टाकण्यात आलं आहे. अशा प्रवाशांच्या हवाई प्रवासावर सहा महिन्यांपर्यंत प्रतिबंध घातला जाऊ शकतो. तर तिस-या भागात धमकी देणारे, गोंधळ घालणा-या प्रवाशांना टाकण्यात आलं आहे. त्यांच्यावर जवळपास दोन वर्षांहून अधिक काळ विमान प्रवासावर बंदी घातली जाऊ शकते.
तर गेल्या काही दिवसांपूर्वी विमानाने देशांतर्गत प्रवास करायचा असेल तर आता प्रवाशाकडे सरकारी ओळखपत्र असणं गरजेचं करण्यात आलं आहे. देशांतर्गत विमान प्रवासाचं तिकीट काढण्यासाठी आधार कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), पासपोर्ट किंवा पॅन कार्ड क्रमांक यापैकी एका ओळखपत्राचा क्रमांक देणं बंधनकारक असणार आहे. 8 सप्टेंबर रोजी केंद्र सरकार यासंदर्भातील नियम जाहीर करणार आहे. यामध्ये मतदान ओळखपत्राचा क्रमांकही चालू शकतो, पण त्याबाबतचा निर्णय अजून घेण्यात आलेला नाही.भारतात सुरक्षेच्या दृष्टीने ‘नो फ्लाय लिस्ट’ तयार करण्यात आली असून, हा निर्णय घेण्यात आला आहे. इतर अनेक देशांमध्ये अशा प्रकारचा नियम करण्यात आला आहे. या नवीन नियमामुळे एका व्यक्तीच्या तिकिटावर दुसरा व्यक्ती प्रवास करण्याच्या घटना रोखल्या जाऊ शकतील, असं केंद्रीय उड्डाण राज्यमंत्री जयंत सिन्हा म्हणाले आहेत. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाची टीम मंगोलिया येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘ग्लोबल रेग्युलेटर्स’च्या बैठकीला उपस्थित होती. त्याठिकाणी हा निर्णय घेण्यात आल्याचंही जयंत सिन्हा म्हणाले आहेत.'नो फ्लाय'च्या नियमांबाबत आमच्याकडे काही सूचना आल्या होत्या. त्याबाबत योग्य तो विचार करुन देशांतर्गत प्रवासाबाबतचे नवीन नियम तयार करण्यात आले आहे, अशी माहिती जयंत सिन्हा यांनी दिली आहे. याशिवाय देशांतर्गत विमान प्रवासाचं तिकिट काढताना आधार कार्ड क्रमांक देणाऱ्या प्रवाशांना लवकर डिजिटल बोर्डिंग पास देण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यामुळे नागरिकांना देशांतर्गत विमान प्रवासाचे तिकीट काढताना यापुढे सरकारी ओळखपत्र स्वतःकडे ठेवणं बंधनकारक असणार आहे.