जालौन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १६ जुलैलाच जालौनच्या कैथेरी गावातून बुंदेलखंड एक्स्प्रेस वेचे लोकार्पण केले होते. त्याच्या पहिल्या पाच दिवसांतच रस्ता खचला आहे. धक्कादायक बाब म्हणजे रस्त्याच्या मधोमधच दोन फूट खोल खड्डा पडल्याने त्यात एक कार कोसळली आहे.
या रस्त्यावरील खड्डा बुजविण्यासाठी ताबडतोब जेसीबी पाठविण्यात आला. या घटनेने खळबळ उडाल्याने अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. या घटनेमुळे सोशल मीडियावर लोकांनी हायवेच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे.
उद्घाटनाच्या ५ दिवसांनी छिरिया सलेमपूरजवळ बुंदेलखंड एक्स्प्रेस वेचा रस्ता खचला आहे. या हायवेवर गेल्या पाच दिवसांत झालेल्या अपघातात ४ जणांचा मृत्यूही झाला आहे. बुधवारी रात्री बाईक आणि कारचा अपघात झाला होता. रस्ता खचल्याचा व्हिडीओ बनवून तो सोशल मीडियावर टाकल्यानंतर हायवे ऑथरिटीच्या अधिकाऱ्यांमध्ये धावपळ उडाली. या प्रकरणी युपीडाच्या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
सरकारच्या ड्रीम प्रोजेक्टमध्ये समाविष्ट असलेल्या बुंदेलखंड एक्स्प्रेस वेचे उद्घाटन खुद्द देशाच्या पंतप्रधानांनीच केले, पण भ्रष्टाचारामुळे करोडो रुपये बुडाले, अशी टीका सोशल मीडियावर लोकांनी केली आहे. एक्स्प्रेस वेमध्ये निकृष्ट दर्जाचा माल वापरण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. बुंदेलखंड हायवे अवघ्या 28 महिन्यांत पूर्ण झाला आहे. यामुळे युपी सरकारचे 1132 कोटी रुपये वाचल्याचा दावा करण्यात आला होता.