उत्तर प्रदेशातील चंदौली जिल्ह्यातील पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शनच्या जीआरपीने एका सामान्य दिसणाऱ्या व्यक्तीकडून 40 लाख रुपये जप्त केले आहेत. जप्त करण्यात आलेल्या सर्व नोटा पाचशे रुपयांच्या आहेत. जीआरपीच्या म्हणण्यानुसार ही मोठी रक्कम कोणत्याही कागदपत्रांशिवाय अवैधरित्या नेली जात होती.
याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली असून तो मूळचा राजस्थानमधील बिकानेरचा रहिवासी आहे. पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शनच्या जीआरपी अंतर्गत येणाऱ्या दिलदारनगर रेल्वे स्थानकावरून ही व्यक्ती 40 लाख रुपयांची मोठी रक्कम घेऊन पाटण्याकडे जात होती. जिथे जीआरपीच्या जवानांनी त्याला चेकिंग दरम्यान पकडलं. सध्या पोलीस पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.
पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शनच्या जीआरपी पोलीस स्टेशन हद्दीतील डीडीयू जंक्शन पाटणा रेल्वे मार्गावर असलेल्या दिलदारनगरमध्ये जीआरपीचे जवान नियमित तपासणी करत होते. यावेळी त्यांची नजर एका सामान्य दिसणाऱ्या माणसावर पडली. ज्याच्याजवळ एक जड बॅग होती. जीआरपीच्या जवानांनी संशयाच्या आधारे या तरुणाच्या बॅगची झडती घेतली असता त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. पिशवीत पाचशे रुपयांच्या नोटा भरल्या होत्या.
यानंतर दिलदारनगर स्थानकावर उपस्थित असलेल्या जीआरपी कर्मचाऱ्यांनी तरुणाला पकडून दीनदयाल उपाध्याय जंक्शनवर आणले, तेथे त्याची चौकशी करण्यात आली. जीआरपी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त केलेली रक्कम एका भंगार विक्रेत्याची आहे जी दिलदारनगरहून पाटण्याला नेली जात होती. एवढ्या मोठ्या रकमेबाबत या तरुणाकडे कोणत्याही प्रकारची वैध कागदपत्र नव्हती. त्यावर जीआरपीने कारवाई करत ही रक्कम जप्त केली.
या संदर्भात अधिकारी कुंवर प्रभात सिंह यांनी सांगितलं की, दिलदारनगर रेल्वे स्थानकावर जीआरपी आणि आरपीएफकडून तपासणी केली जात होती. यावेळी एक संशयित व्यक्ती दिसली. ज्याच्याकडे बॅग होती. त्याच्या बॅगची झडती घेतली असता, त्यातून 40 लाख रुपये जप्त करण्यात आले. चौकशीत त्याने आपलं नाव चंद्र प्रकाश शर्मा असल्याचं सांगितलं. याप्रकरणी पुढील कारवाई करण्यात येत आहे.