अजमेर: राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यातल्या आनासागर तलावात शुक्रवारी अचानक २ हजार रुपयांच्या नोटा आढळून आल्या. नोटा पाण्यात तरंगत असल्याचं पाहून लोकांना आश्चर्याचा धक्का बसला. पोलिसांनी तलावातून रोकड जप्त केली. नोटा ओल्या असल्यानं अद्याप त्या मोजण्यात आलेल्या नाहीत. मात्र या नोटा बोगस असल्याची माहिती आनासागर एसपी बलदेव सिंह यांनी सांगितलं.
आनासागर तलावात दोन हजारांच्या नोटांची बंडलं दिसत असल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सगळ्या नोटा ताब्यात घेतल्या. नोटा ओल्या असल्यानं अद्याप त्यांची मोजदाद झाली नसल्याचं बलदेव सिंह म्हणाले. नोटा कोरड्या होताच त्यांची मोजणी सुरू करण्यात येईल. या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती सिंह यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तलावाजवळ काही लोक फिरत होते. त्यावेळी त्यांना प्लास्टिकच्या पिशवीत २ हजार रुपयांच्या नोटांची बंडलं पाण्यात तरंगताना दिसली. नोटा पाण्यात तरंगत असताना लोकांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलीस लगेचच तलावाजवळ पोहोचले. तलावात सापडलेल्या नोटा बोगस असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं.