नवी दिल्ली: संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या नवी दिल्लीतील बुरारी मृत्यूकांडप्रकरणी रोज नव नवीन खुलासे होत असतानाच याप्रकरणी आणखी काही खळबळजनक माहिती आता समोर आली आहे. घरामध्ये सापडलेल्या डायरीतील मजकूरानुसार मृत वडिलांच्या सांगण्यावरून मुलगा डायरी लिहित असल्याची माहिती याआधी समोर आली होती. मात्र पोलिसांनी केलेल्या तपासादरम्यान डायरीतील नोंदींनुसार एक नाही तर पाच मृतात्म्यांच्या दबावाखाली कुटुंबीयांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब आता समोर आली आहे.
11 जणांच्या आत्महत्येनंतर पोलिसांना सापडलेल्या डायरीत पाच आत्म्यांचा उल्लेख असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. तसेच या पाच आत्म्यांनी दिलेल्या आदेशाचं पालन न केल्याची शिक्षा कुटुंबाला मिळाल्याचं या मजकूरावरुन समजतं. ललित यांच्या वडिलांसोबत सज्जन सिंह, हीरा, दयानंद आणि गंगा देवी यांचेही आत्मे ललितच्या संपर्कात असल्याचं उघडकीस आलं आहे. सज्जन सिंह हे ललितचे सासरे होते. हीरा प्रतिभाचे पती होते तर गंगा देवी आणि दयानंद ललितची बहिण सुजाताचे सासू-सासरे होते. या सगळ्यांचे मृत्यू ललितच्या वडिलांच्या मृत्यूनंतरच्या काळात झाले होते.
डायरीतील मजकूरानूसार या पाचही व्यक्तींचे अंत्यविधी हे योग्य प्रकारे न झाल्यामुळे त्यांच्या आत्म्यांना शांती मिळाली नव्हती. त्यामुळे ललितच्या वडिलांप्रमाणेच हे आत्मेही त्याला सल्ले देत असत. त्यांनी दिलेल्या काही सल्ल्यांची नोंद ललितने डायरीत केली आहे. एका नोंदीत कष्ट करुन पैसे कमवण्याचा सल्ला कुटुंबाला दिला आहे. तर एका नोंदीत भविष्यासाठी पैसै साठवण्याचा सल्ला दिला आहे. तर एका ठिकाणी घराच्या नुतनीकरणाचे काम थांबण्याचे कारण कुटुंबीयांनी ललितवर विश्वास ठेवला नसल्याचंही म्हटलं आहे.