नवी दिल्ली : दिल्लीतील बुरारीमधील एकाच घरात 11 मृतदेह आढळल्यानं एकच खळबळ माजली. या प्रकरणाचा तपास दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून सुरू आहे. एका स्वयंघोषित बाबाच्या आहारी जाऊन कुटुंबानं आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी आधी व्यक्त केला होता. मात्र आता या कुटुंबातील सर्वात लहान मुलगा असलेला ललितच या आत्महत्यांसाठी जबाबदार असल्याची शक्यता पोलीस व्यक्त करत आहेत. याशिवाय दिल्लीतील बुरारीमधील संतनगरमध्ये झालेल्या आत्महत्यांमागे अंधश्रद्धा हे प्रमुख कारण असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. मोक्षप्राप्तीसाठी या कुटुंबानं स्वत:चं जीवन संपवलं असावं, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. घरात सापडलेल्या दोन रजिस्टरमध्ये मरण आणि त्यानंतर होणारी मोक्षप्राप्ती असा मजकूरही पोलिसांना सापडला आहे. घरातील 11 मृतदेहांमागील 11 या आकड्यानं पोलिसांना कोड्यात टाकलं आहे. पोलिसांना तपासादरम्यान घराच्या भिंतीत 11 पाईप आढळून आले आहेत. हे 11 पाईप घराच्या भिंतीतून बाहेर पडले आहेत. विशेष म्हणजे हे पाईप एकमेकांच्या अतिशय जवळ लावण्यात आले आहेत. हे पाईप नेमके कशासाठी लावण्यात आले होते, याचा शोध सध्या पोलिसांकडून सुरू आहे. यातील सात पाईप सरळ, तर चार पाईप वळलेल्या अवस्थेत आहेत. आत्महत्या केलेल्यांमध्ये सात महिला आणि चार पुरुषांचा समावेश असल्यानं यावरुन तर्कवितर्क लढवले जात आहेत. अकरा या आकड्याचा योगायोग इथेच संपत नाही. घरात लावण्यात आलेल्या तावदानाला 11 अँगल आहेत. याशिवाय या घरात 11 खिडक्या आहेत. त्यामुळे घरातल्या या 11 फॅक्टरचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.
Burari Death : 11 पाईप, 11 खिडक्या आणि 11 मृतदेह; फक्त योगायोग की नियोजन?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2018 4:43 PM