नवी दिल्ली - माणसाप्रमाणेच मुक्या प्राण्यांनाही ते राहत असलेले घर आणि त्या घरातील माणसांविषयी जिव्हाळा असतो. त्यामुळे कुटुंबातील माणसांचा विरह हे मुके प्राणीही सहन करू शकत नाहीत. काही दिवसांपूर्वी दिल्लीतील बुराही येथे एकाच कुटुंबातील 11 जणांनी गळफास घेऊन जीवन संपवले होते. त्यानंतर या कुटुंबीयांच्या पाळीव कुत्र्याने घरच्या सदस्यांचा विरह सहन न होऊन प्राण सोडले. बुराडी येथील 11 कुटुंबीयांनी रहस्यमयरीत्या गळफास घेऊन आत्महत्या केल्यानंतर या कुटुंबीयांचा टॉमी हा कुत्रा चर्चेत आला होता. कुटुंबातील सगळ्याच सदस्यांचा मृत्यू झाल्याने धक्का बसलेल्या या टॉमीला नोएडा येथील हाऊस ऑफ स्ट्रे अॅनिमल्स या संस्थेमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र त्याला इथे आणल्यापासूनच तो अस्वस्थ होता. त्याने अन्नपाणी सोडले होते. त्याच्यावर इलाज करण्यात येत होता. मात्र अखेरीस रविवारी संध्याकाळी त्याचा मृत्यू झाला. हृदयविकारच्या झटक्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सुमारे 22 दिवसांपूर्वी 30 जूनच्या रात्री बुराडी येथील भाटिया कुटुंबातील 11 सदस्यांनी गळफास घेऊन जीवन संपवले होते. त्यावेळी या कुटुंबीयांचा पाळीव कुत्रा टॉमी हा घराच्या टेरेसवर बांधून ठेवलेला होता. या सामुहीक आत्महत्येचे वृत्त पसरताच बुराडीच नाही तर संपूर्ण देशभरात खळबळ उडाली होती. दरम्यान, या कुटुंबीयांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या झाली, याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते. अखेरीस पोस्टमॉर्टेम अहवालातून या कुटुंबीयांची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले.
Burari Deaths : कुटुंबीयांच्या आठवणीने व्याकूळ झालेल्या कुत्र्यानेही सोडले प्राण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2018 1:18 PM