नवी दिल्ली : दिल्लीच्या बुरारी भागातील संतनगरमधील एकाच कुटुंबातील ११ जणांच्या सामूहिक आत्महत्येने एकच खळबळ उडाली असताना या प्रकरणातील गूढ दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. 11 जणांचा मृत्यू ही हत्या आहे की आत्महत्या याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. या प्रकरणात दररोज नवी माहिती समोर येत आहे. या घरामध्ये सापडलेल्या डायरीतील मजकूरानुसार मृत वडिलांच्या सांगण्यावरून मुलगा डायरी लिहित असल्याची माहिती आता समोर आली आहे. या धक्कादायक माहितीनंतर आता दिल्ली मृत्यूकांडाला एक नवं वळण मिळालं आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायणी भाटिया यांचा लहान मुलगा ललित कोणाच्या तरी आदेशानुसार डायरी लिहीत असल्याची माहिती समोर आली आहे. या डायरीतील सूचना कुटुंबातील कुटुंबातील सर्व सदस्य अंमलात आणायचे. वडील गोपाळदास यांच्या सूचनेवरुन ललित डायरी लिहियाचा, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ललितच्या वडिलांचा 10 वर्षांपूर्वीच मृत्यू झाला असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे. तसेच डायरीमध्ये एका ठिकाणी 'ललितची चिंता करू नका, मी जेव्हा येतो तेव्हा तो थोडा अस्वस्थ होतो', असाही मजकूर आहे.
डायरीतील पुढच्या पानांवर 'मी उद्या किंवा परवा परत येईन, नाही येऊ शकलो तर नंतर नक्कीच येईन' असा उल्लेख करण्यात आला आहे. तर दुसऱ्या पानावर 'ललितची आई नारायणीचा काळजी घ्या' असा सल्ला ही एक अज्ञात व्यक्ती कुटुंबीयांना देताना दिसत आहे. तर पुढच्या काही पानांवर ललितचे वडील सगळ्यांना वाचवण्यासाठी येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. डायरीमध्ये वेगवेगळ्या स्वरूपातील मजकूर आढळला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण कुटुंबीय डायरीतील सूचनांची अंमलबजावणी करायचा. त्यामध्ये ज्याला जसे करण्यास सांगितले होते. तसेच त्यांनी केले. एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2015 मध्ये सगळ्यात पहिल्यांदा डायरी लिहिण्यास सुरुवात झाली होती. त्यानंतर काही महिने त्यात काहीही लिहिण्यात आले नव्हते. मात्र नंतर लिहिण्यास सुरुवात झाली. त्यानंतर 40-50 पानांवर मजकूर लिहिण्यात आला आहे.