नवी दिल्लीः जर आपण विमानानं प्रवास करत असाल तर आपल्यासाठी महत्त्वपूर्ण बातमी आहे. जम्मू-काश्मीरमध्ये अनुच्छेद 370 हटवल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान सैरभैर झाले आहेत. त्यामुळे केंद्रातल्या मोदी सरकारनं दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा वाढवली आहे. देशातल्या सर्वच विमानतळांवरची सुरक्षा वाढवण्यात आली असून, गुप्तचर यंत्रणांनीही सतर्कतेचा इशारा दिलेला आहे.नागरी उड्डयन सुरक्षा ब्यूरो (BCAS)नं आपल्या विधानात म्हटलं आहे की, विमान कंपन्या आणि विमानतळावरील प्रशासनानंही घरगुती उड्डाण करणाऱ्या प्रवाशांना तीन तास आधी विमानतळावर पोहोचण्यास सांगितलं आहे. तसेच परदेशात जाणाऱ्या प्रवाशांना 4 तास आधीच विमानतळावर येण्यास सांगण्यात आलं आहे. विमानतळावर येणारे ड्रोन मॉडल आणि मायक्रोलाइट एअरक्राफ्टवर नजर ठेवली जाणार आहे, यासाठी क्विक रिऍक्शन टीम तैनात करण्यात आली आहे. 30 ऑगस्टपर्यंत हे निर्बंध लागू राहणार आहेत. स्वातंत्र्याच्या दिवसानिमित्त खबरदारीचा उपाय म्हणून ही सुरक्षा वाढवण्यात आल्याचीही माहिती विमानतळ प्रशासनानं दिली आहे. हा नवा नियम 10 ऑगस्टपासून 30 ऑगस्टपर्यंत लागू राहणार आहे.सामान्य स्वरूपात घरगुती प्रवाशांना उड्डाणाआधी दोन तास, आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी तीन तास आधीच विमानतळावर जावं लागणार आहे. 30 ऑगस्टपर्यंत विमानतळावर व्हिजिटर पास मिळणार नाही. व्हिजिटरचा प्रवेश बंद करण्यात आला आहे. तसेच विमानतळावर आता कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. तसेच एखादी गाडी पार्किंगमध्ये उभी असल्यास तिचीही चौकशी होणार आहे.तसेच एअरपोर्ट टर्मिनलच्या बाहेरच पिकअप अँड ड्रॉपची सुविधा घ्यावी लागणार आहे. सर्वच प्रवाशांची विमानतळावर प्रवेश करण्यापासून विमानात बसेपर्यंत सखोल चौकशी होणार आहे. प्रवाशांशिवाय पायलट, क्रू मेंबर्ससह ग्राऊंड स्टाफसह विमानतळ कर्मचाऱ्यांची चौकशी केली जाणार आहे. तसेच यात कोण नशापान करतं हेसुद्धा पाहिलं जाणार आहे. सगळ्यांनाच या तपासणीच्या चक्रातून जावं लागणार आहे.
विमान प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, आता 4 तास आधीच जावं लागणार विमानतळावर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2019 2:57 PM