ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 8 - बुरहान वानी या दहशतवाद्याला कंठस्नान घातल्यास आज एक वर्ष पूर्ण होत असून फुटीरतावाद्यांवर चाप बसवण्यासाठी तीन ठिकाणी संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. कायदा व सुरक्षा राखण्यासाठी लष्कराचे तसेच निमलष्करी दलाचे जवान जागोजागी तैनात करण्यात आले आहेत. वानीचं मूळगाव असलेल्या पुलवामा जिल्ह्यातील त्रालमध्येही संचारबंदी आहे. काश्मिर खोऱ्यामध्ये शांतता रहावी म्हणून खबरदारी घेण्यात येत असल्याचे लष्कराने स्पष्ट केले आहे.
वानीला श्रद्धांजली देण्यासाठी त्रालला मोर्चा न्यावा असं आवाहन फुटीरतावाद्यांचे नेते सय्यद शाह गिलानी आणि मिरवैझ उमर फारूक यांनी केले आहे. गेल्या वर्षी 8 जुलै रोजी बुऱ्हान वाणी जवानांशी झालेल्या चकमकीत मारला गेला होता. तेव्हापासून काश्मिरमधली परिस्थिती चिघळली आहे. त्राल खेरीज सोफियान आणि ट्रेहगाम येथे संचारबंदी लागू करण्यात आली असून अन्य ठिकाणीही संचारावर नियंत्रण ठेवण्यात येत आहे. विद्यापीठांनी आज असलेल्या परीक्षाही पुढे ढकलल्या आहेत. दुकानदारांनीही दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून दुपारपर्यंत काश्मिर खोऱ्यात तणावपूर्ण शांततेचं वातावरण होतं.
जम्मू काश्मीर : दहशतवादी हल्ल्यात 3 जवान जखमी
जम्मू-कश्मीरमधील बांदीपोरा येथे दहशतवाद्यांनी भारतीय लष्करातील सैनिकांवर हल्ला केल्याचे वृत्त समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या दहशतवादी हल्ल्यात तीन जवान जखमी झाले आहे. हा हल्ला बांदीपोरामधील हाजिन परिसरात झाला आहे. हल्ल्यानंतर तातडीनं जवानांकडून परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, भारतीय सुरक्षा दलानं हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुरहान वानीला कंठस्नान घातल्याच्या घटनेला आज (8 जुलै) एक वर्ष पूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर काश्मीर खो-यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी काश्मीर खो-यात 20 हजारहून अधिक जवान तैनात करण्यात आले आहेत. शिवाय अमरनाथ यात्रेसाठी आलेल्या यात्रेकरुंच्या सुरक्षेसंदर्भातही योग्य ती पाऊले उचलण्यात आली आहेत.